मे महिना…. विचारांचा वणवा………
मे महिना…. विचारांचा वणवा………
मे महिन्याची सर्वच जण वाट बघत असतात….विश्रांती विश्रांती आणि विश्रांती!
सगळे कसे निवांत…कुणाला शाळा कॉलेजला जायची, कोर्टात जायची गडबड नाही, स्वयंपाकाला ही ब-याचदा दांडी मारता येते…कारण काही तरी बाहेरचे प्लॅन ठरतात अचानक….बाहेर ऊन मी म्हणत होते ….म्हणुन सगळावेळ फ़ॅमिली समवेत सध्या घरातच…
रोज नवीन नवीन नवीन पदार्थांची फ़र्माइशी ह्यांनी आणि मुलाने करावी आणि ती मी पूर्ण करणे..एवढेच नाही तर कधी आम्ही दोघे मुलाला किंवा मी आणि मुलाने ह्यांना अशा त-हेने आमच्या कडे प्रत्येकाच्या हातचे काही तरी वेगवेगळे बनवले जाते….म्हणुन मजा येते…सकाळी आमरसावर ताव मारणे चालुच आहे….बाहेर वैशाख वणवा…तर घरात हिंदोळा…एकमेकांच्या सहवासात टाइमपास करणे …..पूर्ण वर्षाचा कॅटलॉग भरुन काढणे होते या महिन्यात……
सध्या आयपीएलचे वारे वहात असल्याने आमचा रिमोटवरचा कंट्रोल सुटला हे सूद्न्यास सांगणे न लगे ! मधल्यावेळेत मग काही तरी बघायला मिळते ही गोष्ट वेगळी म्हणा!
आज काल टीव्ही वरील ’सिरियल्स’ ना “सिरियल किलर” का संबोधु नये असे मनात येवुन गेले…सध्या घरोघरी य़ा सिरियलसचा धुमाकूळ घातला जातोय…जणु काही टीव्ही सिरियल्सचा वणवा पेटला आहे…..एक तरी धड आहे का? अर्थात नियमाला अपवाद असू शकतो म्हणा ! म्हणजे माझ्या कडे तरी अपवाद नाही …तुमच्या कडे असेल तर जरुर सांगा….
सध्या क्रिमिनल सिरियल्सचा टीआरपी चांगला आहे असे कळल्याने प्रत्येक चॅनल्सवाले आता क्रिमिनल सिरियल्स काढत सुटलेत….मला तर सुरुवातीला तेच बरे वाटु लागल्याने दुसरे काही बघुच वाटेना….मग त्याची सत्यता आणि तथ्य विचारात घेता म्हणले की बस्स ! आता खुप झाले!..नाही तर आपण आपली सदसद विवेकबुद्धी कदाचित अशाने गहाण टाकु की काय!
महादेव मालिका छान वाटली म्हणुन बघत होते….तर त्यात जुळे महादेव टपकले आणि ती बंद केली बघायची. तशीच अवस्था झाशीच्या राणीची झाली होती..यांना डबलरोल आणुन काय दर्शवायचे असते कुणास ठावुक?.मराठी तर “तु तिथे मी” ,” पुढचं पाऊल”, सारख्या मालिका तर कहरच आहे…..”राधा” तर “सांगा मी कुणाची? ह्याची का त्याची?” करत पिडत बसलीय….पण त्यातल्यात्यात तीच बरी आहे म्हणायचे….”मला सासू हवी” आणि “शेजारी शेजारी..पक्के शेजारी”…अरे बापरे बाप! त्याबद्द्ल तर काही बोलणेच नको. या दोन ही मालिका म्हणजे फ़ालतु पणाचा कळस आहे कळस! जे कुणी या मालिका बघत असेल त्यांची कीव करावीशी वाटते…त्याच्या रसिकपणाची पण कमाल आहे.. ”उंच माझा झोका” ही छान आहे मालिका …रमाबाई रानडे यांच्या विषयी बरीच माहिती मिळते आहे…पण आलवणीतल्या बायांवर आणि त्यांच्या पासून होणा-या त्रासावर जरा जास्तच फ़ोकस होतोय असे वाटु लागले आहे…आणि बाकीच्या रामरगाड्यात मुळ रमाबाईंचे कार्यच पुसट तर होत नाही न? असे वाटु लागले आहे….
सध्या सर्वात मस्त वाटते ते मास्टर शेफ़…..मस्त कार्यक्रम आहे….सर्वांनी बसुन बघण्यासारखा आहे…आवडला…त्याच प्रमाणे लहान मुलांचा “इंडीयाज बेस्ट ड्रामेबाज”…हा कार्यक्रम…खरतर परिक्षकांवर कार्यक्रमाचे म्हणजे टीआरपी चे यश आहे असे वाटते…योग्य परिक्षक कार्यक्रम खुलवु शकतो…..
असो! एकदंरित सध्या टीव्ही में कुछ दम नहीं! ….अशी परिस्थिती आहे…..
फ़ेसबुक, आर्कुट, ट्वीटर या सारखे मायाजाल…फ़ार माया लावु शकत नाहीत आता…
सध्या आता एक नवीन आवड जोपावीशी वाटली…अर्थात इतके वर्षात का नाही सुचले म्हणुन दोष देत होते स्वत:वर….पण हरकत नाही….वयाची ५०शी उलटली आणि मी हार्मोनियमचा क्लास जॉइन केला आहे…खुप मस्त वाटते आहे….खरच संगीत इतका आनंद देवु शकते याचे गणित आता उलगडले…संगीत शिकणे सुरु झाल्या पासुन मनातील विचारांची गती कमी होवुन स्वास्थ लाभल्याचे जाणवते आहे…मनात विचारांचा नेहमी वणवा पेटत असे….पण आता ब-या पैकी छान वाटते आहे…
असाच हा विचारांचा वणवा थोडा विस्कळीत स्वरुपात आपल्या समोर ठेवला….वणवाच तो…एकसंध थोडाच असेल?
————————————————————————————————————
-सौ.पल्लवी उमेश कुलकर्णी…


