माझा ब्लॉग, माझे विचार!

सुनी मैफिल

“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या…….”
हे गाणं आज माझ्या सारखं मनात येतंय।सारखं मनातल्या मनात गुणगुणतय।
काल रात्री आमची 8 दिवसाची जमलेली मैफील संपली।।
आज ना ती मैफील ना तो माहौल।ना ती किलबिल न ती गजबज।
पिल्लुची किलकारी नाही,रडणे हट्ट करणे नाही।आजी ची कुशी आज रिती रिती।गळ्याभोवती पडलेले हात आज मी चाचपडते आहे।आईच्या तक्रारी आपल्या बोबड्या भाषेत ऐकायची कानाची सवय काही स्वस्थ बसू देईना आज।
घरट्या कडे क्षणभर विसाव्यास आलेली पिल्लं काल रात्री आपापल्या आकाशात परतली।।दस का बिस करत परत कामाला जुंपली गेली परत लंबी सुट्टीच्या प्रतिक्षेत।
आज तो गोंगाट नाही, ती गप्पांची मैफील नाही
पत्यांचा डाव नाही।खाण्याच्या फर्माईशी नाहीत की।दुपारचे पिक्चर बघताना हॉल मध्ये कसे ही वेडेवाकडे लोळणे नाही।।
ना आज घरात पसारा ना आवरा आवर। ना कपबशींचे धुवायचे ढीग ,न कपड्यांचे बोळे इतस्ततः पसरलेले।।ना मुलांवर ओरडणे आवरा रे बाबांनो।किती हा पसारा?? घर आहे की……??
पण आज सगळं कसं स्वच्छ स्वच्छ।।प्रत्येक गोष्ट आपापल्या जागेवर। काहीतरी चुकल्या सारखं वाटतंय। नवरा आपल्या उद्योगाला लागला।।।अब मैं और मेरी (तनहाई)सिरीयल फिरसे शुरु।
आठवणींच्या शिदोरीवर दोघांच्या आमच्या गप्पा होतील शिळ्या कढीला ऊत येईल।।पिल्लाच्या नटखट लीलांचे पारायणे होतील।मोबाईलवर शूट केलेले व्हिडीओ सतत पाहिले जातील।।फोटो बघितले जातील वारंवार।।
आणि शेवटी म्हणू, “चालायचंच !आता या पुढे आपण दोघेचं।तुला मी अन मला तू….या पुढं हे असंच होणार…”
आणि एकमेकांना साथ देत एकमेकांची समजूत काढून आपण किती धीराने घेतोय दुसर्यापेक्षा हे दाखवायचा अट्टाहास करायचा।।पण दोघांनाही माहीत आहे दुसरा किती पाण्यात डुबलाय ते…डोळ्यात किती पाणी डबडबलंय हे ती दोघे लपवताहेत,कारण ती दोघे काही आज ओळखत नाहीत एकमेकांना।।आता बोलण्यापेक्षा नजरेने ओळखतो आपण एकमेकांना हे माहीत आहे.

पल्लवी उमेश
23/10/17

Advertisements

आई…..वर्ष श्राद्धानिमित्त वंदन।

 

एक क्षण असा गेला नाही
त्यात तुझी आठवण नाही
प्रत्येक श्वास तू, उच्छ्वास तू
आठवांचा महापूर मनात भिजतो
आज खूप छळतेस ग आई तू
मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय
लहान बाळ नाही माहीत आहे मला
पण तुझी आठवण येतेय त्याला वय काय मोजायचे होय।
तुझी मायेची सावली प्रेमाचा हात आता फक्त का त्या फोटोतच होय?
ये की बाहेर परत आणि घडव की ग काही चमत्कार
भिजतो पदर वारंवार माझा
आज न अंत त्याचा
समर्थ म्हणतात ते आज पटते
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे…
बाबा तर तुला सोडतच नाही
त्यांना ही तुझ्याशी अजून खूप बोलायचे आहे
तू मला बोलावं ग म्हणून टाहो फोडत आहेत।।
काय करू आई माहेर माझे फक्त तुम्हीच तर आहे।

गौरी आगमन आणि घरच्या गौरी च प्रस्थान।
कसा ग असा मुहूर्त साधलास आई?

संचेतीत तू असताना सुविचाराने गायलेली
तुझी महती आज ही
तितकीच फिट आहेत

बास करते आई
शब्दात नाही बोलू शकत
शब्दांचे सैलाब आदळतात
मनाच्या कोपऱ्यात बरसतात
व्यक्तांच्या पलीकडे तोकडे माझे शब्द
समजतात तुलाच आणि फक्त तुलाच।
इतकीच माँ तुला
शब्द सुमनांची अंजलि
वाहते तुझ्या चरणी
आशीर्वाद आहेच तुझा,
तो सदा राहो मस्तकी
वर्ष श्राद्ध तुझे
छळते आज मला।
तुझीया चरणी लीन
असेन मी नित्य सदा ।
मायेची पाखर घाल माये
पदरी आशिष असो दे।
—————————-

पल्लवी उमेश

झोका…

झोका…

झोका दे ग सये
उंच सूर मारू।
माहेराच्या अंगणात
लिंब लोण पेरू।।

झोका घे ग सखे
माय तुझी ताठली।
आठवाचा पूर बघ
तिचा भिजला पदर।।

झोका घेऊन घेऊन
उडतो पदर वाऱ्यावर।
गुज गोष्टी करू मनी
वारा संदेसा देई मायेस।।

सुखा मदे तुझी लेक
नको बावरी होऊ माये।
सण श्रावण लेई साज
संगे पिया धुंद मीआज।।

पल्लवी उमेश

H N Y

सरत्या वर्षाचे ऋण..

आज ३१ डिसेंबर, आणखी एका दिवसाने हे वर्ष संपणार आणि नवे वर्ष सुरू होणार. जुन्या वर्षात घडलेल्या कितीतरी चांगल्या, वाईट घटनांची बेरीज – वजाबाकी मनात सुरू झालेली असते. कुटुंबात कोणा नव्या पाहुण्याचे आगमन, नाही तर कोणाचा तरी चिरविरह, एखादा प्रवास, एखादे पुस्तक, भावलेला सिनेमा, कायमची मैत्री व्हावी अशी एखादी ओळख, अचानक डोके वर काढणारा आजार; प्रेमाने न्हाऊन निघालेले काही जपून ठेवावे असे क्षण, भांडणे, रुसवे, फुगवे, अबोला, जीवनाचे दर क्षणी बदलणारे किती विविध रंग! जाणाऱ्या वर्षाच्या ३६५ दिवसांतले अनेक प्रसंगांचे रंगीत चलत्‍ चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर सरकू लागतात आणि त्यांना कवेत घेऊनच आपण नव्या वर्षाची स्वप्ने रंगवू लागतो. नव्या वर्षाची डायरी लिहायची हा आपला पहिला संकल्प पहिले काही दिवस आपण उत्साहात पार पाडत असतो. मग थोड्याच दिवसांत कंटाळा येऊ लागतो. कितीला उठलो, कुठे गलो, काय खाल्लं याच्या पलीकडे आपली गाडीच जात नाही. तोच तोचपणा हा आपल्या आयुष्याचा नित्यक्रम असतो, तरी नवं वर्ष येताना आपण स्वप्नं रंगवण्याचा बिलकुल आळस करत नाही. गेल्या वर्षीच्या चुका यंदा करायच्या नाहीत, कुणाला दुखवेल असं बोलायचं नाही, रोज व्यायाम करायचा, मिळकत वाढवायची, नवं वर्ष छान छान गोष्टी घेऊन येणार आहे, अशी आपल्या मनाची पक्की खात्री असते.

खरं तर २०१६ ऐवजी २०१७ असं लिहिण्याव्यतिरिक्त आपल्या आयुष्यात काय मोठा क्रांतिकारक फरक पडणार असतो? कालच्या पानावरूनच पुढचे पान सुरू होते. साल बदलणं, गणना करणं ही मानवी कर्तृत्वे. निसर्गाची नित्यक्रम त्याच्या लहरीप्रमाणे हजारो वर्षे अव्याहतपणे चालू असतो; पण जगभर माणसे नव्या वर्षाचे नव्या उत्साहाने स्वागत करतात. हा मनुष्य स्वभावच आहे. माणसाचं आयुष्य प्रवाहासारखं नेहमीच गतिमान असतं. त्यामुळे जुने वर्ष मागे पडून नवे वर्ष पुण्यात येणे यात साचलेपणा नसल्याची एक आभासी का होईना; पण सुखद भावना असते. घडून गेलेले विसरून नव्या आव्हानाला तोंड देण्याची उभारी असते. माणसांच्या विचाराची दिशा नेहमी भविष्यकाळाकडे असते, म्हणून नव्या वर्षाचे हर्षभरीत मनाने स्वागत हे त्याचे एक प्रतीक आहे. मात्र, नवे कवटाळताना ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असा दृष्टिकोन नसावा. जुने कपडे आपण जीर्ण झाले म्हणून फेकून देतो, नवी वस्त्रे धारण करतो. तसे मात्र माणसे जुनी, जरा जीर्ण झाली म्हणून फेकून देण्याचा, दृष्टीसमोरून दूर सारण्याचा प्रयत्न नसावा. आयुष्यात नवी माणसे, प्रेमाची पत्नी, लहान बाळ आली तरी जुन्या माणसांसकट ती स्वीकारण्याची वृत्ती हवी. या जगाचा कायमचा निरोप घेतलेल्या आपल्या माणसांची स्मृतीसुद्धा पुढे कित्येक वर्षे आपल्या मनात जागी असते. तसे जगण्याचे धागेसुद्धा भूत, वर्तमान आणि भविष्यामध्ये चिवटपणे गुंतलेले असतात.

म्हणूनच नव्या वर्षाचे स्वागत करताना हे भान हवे. जुन्या वर्षाबद्दल उतराईची भावना मनात हवी. जुने वर्ष होते, म्हणून नवे वर्ष पाहायला मिळाले याबद्दल नव्या वर्षाचा आनंदोत्सव करताना जुन्या वर्षाचे ऋण मानण्याचीही कृतज्ञतेची भावना मनात हवी. जुन्या वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्ताला निरोप देताना या भावना जागवायला हव्यात.

पल्लवी उमेश

अजब लीला

​🌿अजब लीला🌿
अजब न्याय हा तुझा देवा

सांगेल का कुणी अर्थ नवा
अजब तुझी ही लीला न्यारी

गजब तुझा हा न्याय भारी

संसारी या बुरखा धारी

कोण उभा हा तुझ्या दरबारी।
लक्ष्मी नाम तिजला लाभले

फेरा हा दैवाचा कसा फिरला 

खेळाचा फासा काय पडला

दारिद्र्याने डाव तो साधला।
माऊलीने जन्म दिधला

पित्याने आशेला पंख दिले

जगण्याचे बळ लाभले

संस्कारी पाठ गिरवले।
तारुण्याचा माज उतरला

आटे दाल का भाव समजला

संसाराच्या राम रगाड्यात 

वडीलधारी जड ओझे झाले।
वृद्धाश्रमाचे पीक आले

सरसरून फोफाऊ लागले

आरक्षित करायला मुले धावली

आई बापांनी हार पत्करली।
सत्कर्माच्या नावे दान दिले

उंची रहाणीचा विपर्यास झाला

मुले डे केअरची आश्रित झाली

घरची आजी बेवारस झाली।
जन्मदात्यांना जिते मरण दिले

हाल हाल करून हाल पाजले

जनाची नाही अन मनाची नाही

अमानुषतेची पायरी सोडली।
स्वर्गवासा नंतर रुदाली आली

आई बापास मोक्ष देवविला

नाटकाला अति उधाण आले 

गावजेवण घालून श्राद्ध केले।
काकस्पर्शाने अखेर

मोठेपणा मिरवला

टाळू वरचे लोणी 

याहुनी वेगळे ते काय।

अजब न्याय हा तुझा देवा

सांगेल का कुणी अर्थ नवा।
🌹पल्लवी उमेश🌹

21/12/16

%d bloggers like this: