माझा ब्लॉग, माझे विचार!

“घर”च जेंव्हा “बेघर” होते……

 

“घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती”…….

 

ही कविता खूप काही सांगून जाते. घर म्हणजे नेमकं काय, तिथे प्रेमाला, मायेला किती महत्व आहे यावर ही कविता भाष्य करते.

किती सुंदर अर्थपूर्ण रचना आहे ही. ‘घर’ हा शब्द केवळ दोन अक्षरी, पण त्या दोन अक्षरांना आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी महत्वाची एक गरज म्हणजे घर.नात्यांनी बांधलेले घर हवे..माणसांनी भरलेले,जिथे गोकुळ सतत नांदत असते,आल्यागेल्यांची लगबग  घरातील प्रत्येक भितींना जाणवत असते….ते असते खऱ्या अर्थाने “घर”.

आपण सर्वांनीच अनुभवले आहे असे घर….परिपूर्ण घर.

स्वतःच असं सुंदर घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते प्रत्यक्षात साकार होतं, तो क्षण म्हणजे सुवर्णाक्षराने कोरलेला क्षण असतो..संसार फुलतो, वेलीवर सुंदर फुले येतात,ती वाढतात,मोठी होतात….तेंव्हा प्रत्येक क्षणाचा साक्षीदार हे “घर”असते..कधी कधी वाईट प्रसंग सुद्धा त्याच्या वाट्याला येत असतात,पण घरातील माणसांमुळे,त्यातील नात्यांच्या ओलाव्याने ते पुसट होत,परत तरारून आनंदी होतात..त्या क्षणांना ती वास्तू “तथास्तु”म्हणते…पुढे चालत रहा..मी आहे..हेच कदाचित ती सांगत असावी..

हळूहळू काळ पुढे सरकतो,आणि ती घरची फुले शिक्षणामुळे किंवा लग्न संस्काराने घरापासून किंचित दूर जातात…तेंव्हा आशीर्वादाने आपले हात त्यांच्या डोक्यावर ठेवून “घर” ही हेच म्हणते “तथास्तु”….आशीर्वाद खोटा होत नाही म्हणतात,तसे दुर्देवाने म्हणावे वाटते की,ही बाहेर पडलेली मुले बाहेरच पडतात,ती बहुदा कायमचीच..ते ही आपले घरकुल बांधतात,आपले विश्व उभे करतात..जणू एक घर दुसऱ्या घरास खो देते..कालांतराने “मूळ” ही म्हातारे होते,व्याधी लागतात ,किंवा गरज म्हणून स्थलांतर करतात,आणि मग ते “घर” दुर्देवाने “बेघर”होते…आपल्या माणसांपासून दूर म्हणून ते बेघर..दुसरा कुणी मालकी हक्क गाजवतो त्यावर पण ते आपल्या दृष्टीने कायमचे पारखे होते..अशी एकेक घरे जी आपले आजोळ, गावाकडचे घर, जेंव्हा बेघर होते,तेंव्हा परत जाऊन ही बघणे होत नाही,कारण त्यात पूर्वीचा थाट नसतो,पूर्वीचे हसणे खिदळणे नसते..असते ते फक्त आणि फक्त उदास,केविलवाणी स्थिती….मी अशी तीन घरे पाहिलीत स्वतःची..माझे आजोळ करमाळा,गाव आटपाडी आणि आई बाबांचे सोलापूर…प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः त्या घराचा एक भाग बनलेलो असतो,तोच आपला कुणी तरी ऑपरेशन करून खुडून टाकावा तसा,गळून पडतो तो कायमचाच…ज्याची प्रत्येक वीट बसताना आपण पहातो,रोज पाणी मारून मजबूत करण्यास आपण प्रयत्न केलेला असतो,ते घर सजवतो,फुलवतो,ती वास्तू म्हणते, “मी राहिले रे मजबूत,पण तूच हारलास.”

आज कित्येकांना हा अनुभव आला असेल की,खरचं! त्या घरी किती मस्त वाटत होतं,किती अनुभव एकमेकांबरोबर आपण शेअर केले,छोटं होतं, पण सुख नांदत होतं; ते सुख आज या हवेलीत ही नाही…

आज असे अनेक मोठ-मोठाले वाडे ओस पडलेत. नुकतेच आपण ऐकले R K , किंवा जयप्रभा स्टुडिओ सारख्या मोठ्या वास्तू ही बेघर झाल्यात…

खेड्यातून शहराकडे ओढा असल्याने जुनी खेडी च्या खेडी बेघर होताना दिसत आहेत….

 

आज “सेकंड होम” नावाची संकल्पना अस्तित्वात येतेय..उच्च मध्यमवर्गीयांकडून ती आता मध्यमवर्गीयांपर्यंत आलेली आहेच…म्हणजे दोन घर. एक रहाते घर आणि एक इन्व्हेस्टमेंट घर…ते भाड्याने दिले जाते किंवा कुलूपबंद अवस्थेत राखले जाते…पण त्यात ओलावा असतो का मायेचा?

आज परदेशी स्थायिक लोक इंडियात आमचे घर आहे,ते ही अमक्या अमक्या ठिकाणी म्हणून शेखी मिरवत सांगत असतात…पण स्वतः किती ते त्या घरासाठी राबतात?नुसते पैसे फेकले अन इकडे घर विकत घेतले,एवढेच त्यांचे त्यातले कॉन्ट्रीब्युशन. आज मुंबई,पुणे,बेंगलोर अशा ठिकाणचे सर्वेक्षण केले तर असे आढळून येते की, घरटी प्रत्येक एकजण परदेश वासी आहे..आणि छोट्या गावांची गणती ही काही या बाबत कमी नाहीच आहे…म्हणजे त्यांचे  मागे उरलेले आई बाप त्या घराची काळजी घेतात,फक्त जिवंत आहेत तो पर्यंत..नंतर ती वास्तू अशीच कधीतरी लिलावात निघते,बेघर होते… नात्यातला ओलावा कुठे तरी संपून जात आहे, कोरडेपणा वाढत आहे,हे अतिशय विदारक सत्य समोर येत आहे. निदान प्रौढ व्यक्तींनी आता याची धास्ती घेतलीय असे चित्र दिसतंय..आज मी जे घर उभे केले , ते मला एक दिवस असेच सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे, याची मानसिक तयारी करत आहेत..मग  मुलांकडे जावे लागेल नाहीतर, वृद्धाश्रमात तरी…कारण एकटे रहाणे हे काही कालांतराने अशक्यच असते….

म्हणून मी “बेघर” माणसे  होतात असे न म्हणता “घरे”च “बेघर” होत आहेत, असे म्हणणे योग्य समजते..नव्हे ते संयुक्तिक आहे असे मला तरी वाटते…आपणास ही असे वाटते का हो?

नक्की विचार करा की,नेमके “बेघर” कोण होत आहेत?

————————————————-

पल्लवी उमेश

‘चिन्मय’ शाहूनगर.जयसिंगपूर.

जिल्हा.कोल्हापूर

मोबा.9823735570

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: