Posted in Uncategorized

शोकांतिका…..

शोकांतिका

 

माझी शाळा घरापासून खरंतर खूपच जवळ होती।चालत पाच /दहा मिनिटांवर.पण अस्मादिक कधीच शाळेच्या वेळेआधी पोहचलेच नाही.कमीत कमी आठवड्यातून तीन वेळा तरी उशीर ठरलेलाच आमचा.मग काय उशीरा येणाऱ्या मुलींना एका बाजूला उभे केले जायचे आणि कारण सांगितल्यावर हातावर पट्टीचा प्रसाद मिळायचा.

पण हा प्रसाद हवाहवासा वाटायचा.कारण प्रसाद द्यायला खुद्द मेहरबान देखणे व्यक्तिमत्व लाभलेले आदरणीय मुख्याध्यापक जोशी सर.

आमचा बर्याच मुलींचा क्रश होते ते.मुलींचीच शाळा असल्याने आम्ही खूप मजा करायचो माघारी. सरांच्या जवळ जायला मिळते म्हणून आम्ही म्हणजे आमचा ग्रुप थोडा ठरवून उशीरा यायचा. पट्टी खाण्यात काय मजा असते हे फक्त आमचं आम्हालाच माहीत. त्यांचे ते डोळे,गोरापान रंग,मस्त उंची आणि ते जवळ आले की येणारा मस्त परफ्युमचा मंद सुवास,……अहाहा!

आमच्याच शाळेत त्यांची बायको मराठी विषय शिकवीत होत्या.पण रूपाने एकदम डाव्या…राहून राहून आश्चर्य वाटायचे ,ही जोडी कशी बनवली असेल बरं देवाने? ना रूप, न रंग,न उंची! कुठेच मॅचिंग नाही…..बिचारे सर!(आम्ही म्हणायचो)

टारगट ,लास्ट बेंचर्स म्हणून आमच्या कडे फारसे लक्ष द्यावे, असे कुणी शिक्षकच नव्हते म्हणा!उलट आम्हीच वर्गाला ही पुरून उरणाऱ्या मुली फेमस होतो..आमचा खास कट्टा असायचा..मधल्यासुट्टीत कंपू बसायचा आणि शिक्षक आणि शिक्षिकेच्या जोड्या लावायच्या…पण जोशी सरांना कुणी जोडी सूट होत नाही म्हणून एकमत सर्वांचे!

आणि ती ही चिंता मिटली लवकरच! गणितासाठी एक नवीन बाई आल्या.खूप छान देखण्या एकदम! चांगल्या उंच्यापुऱ्या , गोऱ्यापान,नाकीडोळी नीटस….आम्ही तर पहातच राहिलो.पहिल्या खडूस सरांच्या जागेवर या रुजू झाल्या….मग काय सारा वर्ग हर्षभरीत!

त्या आल्या,त्यांनी पाहिले आणि त्यांनीच जिंकले……असं काहीसं झालं. गाडगीळ बाई त्यांचे नाव.त्यांच्या तासाला आम्ही एकदम शांत आणि लक्ष देवुन अभ्यास करायचो! काय शिकवणे होत..बीजगणित इतकं सोपं होऊ शकत एका आवडत्या शिक्षकामुळे ? हे अचबिंत होण्यासारखच होत…माझ्यावर तर काय जादू झाली कळलेच नाही मला. मी चक्क प्रेमात पडले बाईंच्या! मला त्या खूप आवडायला लागल्या. त्यांच्या विषयाचा अभ्यास मी मनलावून करायला लागले,आणि चाचणी परीक्षेत चक्क पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले…मलाच आश्चर्य वाटले….माझ्यातल्या हुशारीचा मलाच नव्याने शोध लागला.आज पर्यंत कुणाच्या खिजगणतीत नसलेली मी पहिली आले होते! बाईंचे पण आता माझ्याकडे लक्ष गेलं…प्रश्न विचारू लागल्या,उदाहरणे फळ्यावर सोडवायला बोलावू लागल्या… अचानक दोन महिन्यात माझ्यात फरक पडला..नेहमीच्या हुशार मुलींमध्ये कुजबुज सुरू झाली अन मला पुढे बोलावून त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये पण घेतले….आमचा बॅकबेंचर ग्रुप कधी मोडला ते कळलंच नाही मला.आणि याचे श्रेय या बाईंनाच देते मी.त्या माझं पहिलं क्रश होत्या म्हणाल तरी हरकत नाही…

पण माझा पहिला ग्रुप फुटला तरी मी जात होते तिकडे ही…पण प्रमाण कमी झाले होते अभ्यासास लागल्यामुळे…

असेच एकदा खेळाच्या तासाला त्यांच्यात मिसळले तर कळलं की जोशी सरांची जोडी या गाडगीळ बाईंशी लावली होती..आता गॉसिपिंग मध्ये मी क्वचितच असल्याने मला हे नवीन होतं… पण हे ऐकून मी किंचितही रिऍक्ट झाले नाही…हसण्यावारी नेलं.पण मनात मात्र,

” छे!असं असूच शकत नाही,आपल्या बाई एवढ्या काही ह्या नाहीत,” म्हणून स्वतःचीच समजूत घातली,काहीही कारण नसताना…

पण हे गॉसिपिंग मात्र आमचं थोड्याच दिवसात स्पष्ट दिसायला सुरुवात झाली. जोशी सर आणि गाडगीळ मॅडम बऱ्याचदा एकत्र दिसू लागले.त्यांच्यात मैत्री ही बरीच वाढल्याचे स्पष्ट दिसायला लागले…एवढेच नव्हे तर बाहेर मॉल मध्ये, सिनेमाला हीच जोडी दिसू लागली…आणि माझे भावविश्व विस्कटायला सुरुवात झाली.आपल्या आदर्श बाई असं का करत आहेत,म्हणून मी त्रास करून घ्यायला लागले..माझे अभ्यासावरून लक्ष कमी होऊ लागले…पण बाहेर आता उघड उघड चर्चा होऊ लागली होती..जोशी मॅडम गप्प गप्प राहू लागल्या..रजा घेऊ लागल्या….आणि चर्चांना उत येऊ लागला..आमच्या या मैत्रिणी मला चिडवू लागल्या, “काय पण तुझ्या बाई!” म्हणून हिणावु लागल्या.जशी काही मीच चूक केली असे वाटू लागले…मला माझ्या बाई अजून ही आवडतच होत्या ,पण त्यांचे ते वागणे बिल्कुल आवडले नाही….

हळूहळू जोशी सर आणि गाडगीळ मॅडम यांचे रिलेशन अजूनच वाढले…आणि जोशी मॅडम ने राजीनामा देऊन नोकरी सोडली.आम्हां विद्यार्थींनीना या गोष्टीचे खूप वाईट वाटले. सरांचा अतिशय राग येऊ लागला.

आम्ही ही शाळा सोडून आता कॉलेज जॉईन केले होते.. एव्हाना ही बातमी फक्त शाळेपुरती मर्यादित न राहता गावात कळली होती..आणि व्हायचे तेच झाले. गावाने या दोघांनाही वाळीत टाकले.त्यानंतर ही त्यांनी अजून एक दोन लफडी केली असे कानावर आले..

मनातल्या आदर्शाला अशी कीड लागलेली बघून मन आक्रदंत होते..त्रास होत होता..पण हे खरे होते….

मध्यंतरी पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले .

आज लग्नानंतर अनेक वर्षांनी आमच्या शाळेच्या व्हाट्सअप्प ग्रुप मधून कळले की जोशी सर गेले…

वाईट वाटले…वय झाले होते,जाणारच…..

पण एवढेच नाही तिने असे ही पुढे लिहिले होते ,की सर शेवटी शेवटी भ्रमिष्ट झाले होते,रस्त्यावरून फिरताना त्यांनी बघितले होते…लोकांसमोर हात पसरून 2 रुपये द्या म्हणून भीक मागत होते म्हणे…अंगावर कपड्यांची शुद्ध नव्हती …पुढे वाचवेना……हे वाचून मात्र सुन्न व्हायला झालं.पुढे त्यांचा मुलगा ही याच मार्गावरून जात असल्याची माहिती मिळाली…जोशी बाईंचे पुढे काय झाले कळले नाही. सरांच्या अंत्ययात्रेला कुणीच नसल्याने बेवारस म्हणून शेवटी जाळून टाकण्यात आलं…

खरंच!एके काळी अनेक विद्यार्थींनीचा क्रश असलेल्या व्यक्तीची कशी शोकांतिका होते….एखाद्या व्यक्तीची अशी अवहेलना होऊ नये इतकंच!पिंजरा मधील मास्तर आणि आमचे आदर्श शिक्षक काय फरक बरं दोघात?

दोघांचीही शोकांतिकाच!

(खरी घटना,पात्र काल्पनिक)

 

————————————————-

पल्लवी उमेश

21/6/19

 

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s