Posted in लेख

..”जैसी पीढी…..”


“जैसी पीढी……”
शारदीय नवरात्रौत्सव संपला आणि वेध लागले दिवाळीचे. कोजागिरीच्या दिवशी मस्त एन्जॉय करण्याचे मनसुबे आपण आखत आहोत, कुणी गाण्याची मैफील, कुणी नाटक, तर कुणी कविता वाचन करण्याचे बेत आखत आहेत. हा काळ सर्वांग सुंदर असा असतो खरंतर. पावसाने विश्रांती घेऊन परत जाण्याचे संकेत दिलेले असतात. जाताना धरित्री हिरवीगार करून , वेलींवर , फुला, फळांवर  शिंपण करून त्यांना नवजीवन देऊन त्यांच्यात पुन्हा चैतन्य सोडून हा परतत असण्याचा काळ.
आपण ही आपले मनसुबे आखताना मुला बाळांच्या परीक्षेत स्वतःला अडकवून घेतो. समस्त महिला वर्गांची लगबग तर इथून पुढेच खरी चालू होते.घरोघरी महिला कामात असलेल्या दिसतात. कामे काय कमी असतात होय? फराळाचे करणे, त्यासाठी साहित्याची जुळवाजुळव करणे,ते वाण सामान आणण्यासाठी दुकानात सतत फेऱ्या मारणे, कुणी फराळाचे करून विकत असतील तर त्याच्या ऑर्डरी घेणे, घरातल्या सर्वांची कपडे खरेदी, पाहुण्यांची खरेदी,  ….नाना प्रकार या काळात करायचे असतात…या साठी पुरुष वर्ग पैशाची व्यवस्था करण्यात गर्क असतो.
बच्चे कंपनी तर निम्मे लक्ष परीक्षेच्या अभ्यास करण्यात, तर निम्मे दिवाळीत. किल्ले कोणते करायचे,फटाके कोणते उडवायचे, आजी आजोबा, नाहीतर कुणाच्या घरी जायचे. सुट्टीत आई बाबांच्या मागे लागून भटकायचे का….असे विचार करत असतात.
माहेरवाशिणी एखादा दिवस तरी माहेरला जावे म्हणून मनाशी बोलत असतात.. तर पतीदेव लाडक्या पत्नीला पाडवा काय द्यावा म्हणजे ती खूष होईल, याचा विचार करतात ,तर बंधुराय बहिणीला खूष करायचे मनसुबे आखत असतात….
किती किती सुंदर हा काळ असतो दसरा ते दिवाळी दरम्यानचा.
आज मला थोडी रुखरुख वाटते , ती या साठी की ….पूर्वी सारखे आता घराघरांतून फराळाचे वास येत नाहीत, पाहुणे घरभर असत नाहीत, फराळाची ताटे घरोघरी पोहचवली जात नाहीत, रांगोळ्यांच्या स्पर्धा आपापसात होत नाहीत… की हळदीकुंकू ला पण एकमेकींकडे जाणे कमी झाले आहे.
आता मी आणि माझा परिवार आपल्यापुरते सण साजरे करत आहेत. आम्हांला आता कुणाची गरज राहिली नाही. आपापल्या घरात नटायचे , एकमेकांना छान म्हणायचे, ढीगभर फोटो काढून समाज माध्यमात आधी मी म्हणत… चुरशीने पोस्ट करायचे. विकतचे हवे तेवढे फराळाचे घेऊन यायचे ,चार फटाके उडवायचे ,  वाटलचं तर देवाला जाऊन यायचे….म्हणजे झाली दिवाळी…
खरचं अशी दिवाळी आवडते का आपल्याला? आवडते म्हणायला तर हवं! पर्याय आहे का? पण मला वाटते, आजच्या तरुण पिढी चे माहित नाही, पण आमच्या पिढीने ज्यांने एकत्र कुटुंबात दिवाळी साजरी केलीय ,त्यांना हे मी काय म्हणते ते अधिक चांगल्या प्रकारे कळेल. पूर्वी एकत्र कुटुंब असल्याने सर्वजण एकत्र येऊन फराळ बनवत .. घरभर तयार पदार्थांचा दरवळ सुटे..रोज दोन चार पदार्थ, ते ही किलो किलोने बनत…बाकीच्यांनी येता जाता त्यात हात घालून चव बघणे, तारीफ करणे,.  मग महिला वर्ग , ..”जरा देवाला नैवेद्य दाखवु तरी द्या ! का आधीच संपवता आहात”..असे लटक्या रागाने म्हणणे…दिवाळीच्या प्रत्येक दिवशी काय पदार्थ घरात बनवायचा ह्याची चर्चा फराळ बनवता होत असे. घरातील कुणी एक पुरुष बच्चे कंपनीच्या फटाके आणायची जबाबदारी घेई, तर कुणी घर आकाश कंदील, माळांनी सजवण्याची. त्यातल्या त्यात मोठे असतील तर ते कपडे खरेदी करतील ….आजी आजोबा हे तर घरचे आधारस्तंभ असल्याने घर भरल्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असत. त्यांच्याकडून प्रत्येकाला हमखास गिफ्ट असे..इतके सुंदर दिवस असत.
तरी ही आज दिवाळी आली जवळ की आनंद होतोच यात वाद नाही. नवीन पिढीला हे माहीत नाही , पण ती आपापल्या पद्धतीने हा सण अजून चांगला करण्यात मग्न असते. स्त्री तर कुठल्याही वयात असो, नटण्याची मिरवण्याची हौस भागवून घेत असतेच. घरात वेगवेगळे पदार्थ बनतात, आणतात …पण त्यात ही मजा असते. त्यानिमित्ताने घरा घरात खरेदीचे वारे मात्र मागील पिढीपेक्षा जरा जास्तच जोरात वहात असतात…हे नक्की.
मी देखील काही ठराविक पदार्थ घरी करते, काही बाहेरुन मागवते. ‘जैसी पीढी, वैसी हम आगे बढी ‘… हसू नका…घरोघरी मातीच्या चुली….सगळी कडे हे असचं आहे.
मी पण आता माझ्या नातवा बरोबर फुलबाजी उडवत जरुर म्हणणार,
दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कुणाच्या ?
लक्ष्मणाच्या ….
लक्ष्मण कुणाचा ?
आई बापाचा
दे माय खोबराची वाटी
वाघाच्या पाठीत
हाणीन काठी……”
येणाऱ्या या दिवाळी सणाच्या तयारी साठी तुम्हांला खूप खूप शुभेच्छा….
………………………………………………..
©पल्लवी उमेश
6/10/22

Author:

मी पल्लवी ...मला लिहिण्याची खुप आवड..पण मी स्वत:च्या आनंदासाठी लिहिते..कुणी छान म्हणावे , कुणाला आवडावे म्हणुन लिहिण्या पेक्षा मला किती आवडते, आवडले याचा विचार मी प्रथम करते.मी कथा, कविता..लेख इ. च्या माध्यमातुन आपल्या समोर येत आहे.मला सतत आनंदी राहायला आवडते...

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s