Posted in लेख, स्वरचित...

नवरात्र चौथी माळ…

(४)
चौथी माळ………
मला भावलेलं स्त्रीत्व
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…

नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।

||चतुर्थ देवी कूष्माण्डा नमस्तुभ्यम || 

देवी कूष्माण्डा॥
सुरासम्पूर्णकलशम् रुधिराप्लुतमेव च।
दधाना हस्तपद्माभ्याम् कूष्माण्डा शुभदास्तुमे ॥४॥

अर्थ…..
अमृताने परिपूर्ण भरलेला कलश धारण करणारी आणि कमळ पुष्पाने युक्त अशी तेजःपुंज मां कूष्मांडा देवी चे आशीर्वाद आम्हांला सर्व कार्यात शुभदायी ठरू देत.

आज फिरायला संध्याकाळची बाहेर पडले होते. मला रस्त्यावरून बरेच माय लेकरांच्या जोड्या दिसल्या.लेकरं शाळेतून परतत होती..आईच्या खांद्यावर आपल्या दप्तराचे ओझे देऊन मस्त आईचे बोट पकडून उड्या मारत आणि चिवचिवत जात होती. आई बाई पण चक्क आपल्या पोरांचे बोल ऐकत हसत जात होती….कुणी माय मोबाईल बघत नव्हती, की त्यावर बोलत नव्हती…पूर्ण लक्ष त्यांचे मुलांच्या बोलण्याकडे होते…हे खूप सुंदर दृश्य मी अनुभवत होते.
लहानपणी मुलांचे सर्वस्व असते ती त्याची आई. आधी तिला सोडून शाळेत जायचे म्हणजे कर्मकठीण काम. पण शाळा सुटल्यावर शाळेबाहेर उभी असलेली माय बघितल्यावर वासरागत येऊन चिकटते पिल्लू . आणि मग उधळत घरी येते…
आईला काय सांगू न काय नको असे होत असते लेकराला….आणि जी आई ते सर्व बोल ऐकत त्याला दाद देते, ती माय लेकराची जोडी जगात सर्वात श्रीमंत असते.मग ती जोडी झोपडीत असेल ,नाही तर महालात….काही फरक पडत नाही.

आज आईवर खूप साऱ्या लोकांनी लिहिले आहे…मी वेगळं काय सांगणार? आई असतेच खूप भारी..आपल्या लेकरांना जन्मा आधीपासून सांभाळत हलकेच या जगात आणून त्यांचा सर्व प्रकारे सांभाळ करणारी ही आई असते. जरा नजरे आड गेलं आपल बाळ, तर कासाविस होते ती आई. रडणार बाळ पण आईला बघताच तिला चिकटून आपल रड विसरते… गाय वासरांची जोडी पण बघतो आपण..
गाय चरून आल्यावर आपल्या वासराकडे कशी पळत जाते, हे आपण बघितले असेल ….
‘हंबरून वासराले चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय.’
तशीच ही आई असते.
‘ आई ‘ या दोन शब्दातच इतकी जादू आहे , की ती मां किंवा ममा,मम्मा म्हणण्यात नाही.आई नावातच सौंदर्य आहे, नजाकत आहे, प्रेम आहे,आत्मीयता आहे आणि जवळीक आहे..आणि आई उच्चारताच याची हृदयी चे त्या हृदयी सर्व काही पोहचते..लेकराच्या सर्व गोष्टी जाणते ती आई.

आई चे ऋण कधीच फिट नाही म्हणतात ते खरे आहे.जितकं आपली आई आपल्याला ओळखते, तितकं आपला पार्टनर पण जीवनभर एकत्र असून ओळखू शकत नसतो. आणि आईची इतिकर्तव्यता कधी संपतच नाही… मुलं झाली की त्यांचे संगोपन…अगदी लग्ना पर्यंत सगळ करतेच,पण त्यांना मुलं झाली तरी ती त्यांचे ही संगोपन करण्यात रमते ती आई…..म्हणून मी म्हणते की एकदा स्त्री प्रेग्नंट झाली, की ती आयुष्यभरासाठी अडकते आपल्या संसारात. मुलं बाळ हेच तिचे विश्व बनते.
आई कधी रिटायर होत नाही म्हणतात ते हेच.
आजच्या आया ह्या खूप गुंतलेल्या दिसतात.त्यांच्या पायाला भिंगरी लावलेली दिसते. त्या मल्टी टास्किंग करतात… तारेवरची कसरतच म्हणा न! पूर्वी आईला मुलांची सर्व जबाबदारी घ्यावी लागत नसे.कारण एकत्र कुटुंब पद्धत असल्याने काकू,आत्या,आजी या मुलांच्या जबाबदारी वाटून घेत असत…कुणी एक स्वयंपाक करत, तर कुणी जेवायला वाढत, कुणी अभ्यास घेत,तर कुणी लहान लेकरांना सांभाळत…पण
आजच्या स्त्रिया जॉब करतात, त्यामुळे स्वतंत्र राहतात. या नवऱ्याच्या बरोबरीने कमावतात. निर्णय घेतात. घरचे बाहेरचे बघतात…शिवाय मुलं बाळ झाल्यावर त्यांचे ही तितकेच जबाबदारीने करतात…..त्यांच्या या लाईफ स्टाईल मुळे डे केअर या संस्था म्हणून उदयाला आल्या. त्यातिथे मुलांचे संगोपन होते. आई घरी येताना मुलांना घेऊन येतात . घरी आल्या नंतर तर मुलांचे अभ्यास, इतर गोष्टी,खेळ , क्लास ,प्रोजेक्ट ,विविध परीक्षा सर्व सांभाळून या आया परत स्वत:साठी वेळ देताना दिसतात, ते ही हसतमुखाने… भारी कौतुक वाटते हो अशा स्त्रियांचे…त्या हे सर्व करत आपले छंद म्हणजे डान्स,गाणे, लिखाण किंवा इतर काही.. हे जपत असतात…म्हणून कोण कौतुक वाटते मला.
कालची किंवा आजची स्त्री ही किती शिकली किंवा किती नाही शिकली, कमावती असो की न कमावती, चांगली वाईट कशी ही असो ….पण ती आई झाली की ती एकच असते…आपल्या मुलाची माय. त्या बाबतीत ती वेगळी असूच शकत नाही. मुलाला प्रसंगी मारेल,रागावेल पण त्याच्या भल्यासाठीच. ती प्रेम करते ते आतून अगदी मनापासून …आपले सर्वस्व देईल ती आपल्या मुलाला… मुलं पुढे कशी ही वागली तरी प्रत्येक आई ही एकसारखीच वागेल…म्हणजे त्याच्या प्रत्येक हाकेला ओ देणारी…एकच असते ही माय.
आई ची शारीरिक रूपे अनंत आहेत…पण आंतरिक हृदय हे ‘ आई ‘ म्हणून सर्वांचे एकच आहे.
म्हणून म्हणातात न आई आहे तो पर्यंत तुम्ही खूप श्रीमंत असता… तुम्हांला स्वत:ला हे कळतच नसते. आई असताना आपण तिला गृहीत धरतो . हवे तसे बोलतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ती असते. प्रत्येक संकटात ती जवळची मदतनीस आणि पहिल्या हाकेला धावून येणारी तीच असते. आपले काळीज काढून नेणाऱ्या लेकराला तुला लागलं तर नाही न बाळा…म्हणणारी आईच असते.
पण अशा आईचे महत्व मात्र ती दूरच्या प्रवासाला कायमची निघुन गेल्यावरच का कळते माहित नाही.
आभाळा एवढा कागद आणि समुद्रा एवढी शाई घेतली, तरी आईची माया लिहायला जागाच नाही…..एवढी महती तिची….
आई नावातच सर्व अर्थ दडून आहेत…मी अजून काय सांगणार बापडी….माझे ही शब्द अपुरेच आहेत…
आई ही कुणाची ही असो चांगलीच असते,आई म्हणून ती कायम पवित्र असते. मग ती श्रीमंत,गरीब, भिकारी,सेक्स वर्कर्स किंवा वेश्या व्यवसाय करणारी का असेना…आपल्या मुलांसाठी ती तेवढीच पवित्र आणि प्रामाणिक असते.
एकच सांगते,
आई ही आई असते…
तुझी माझी सारखीच असते…..
आई ही आई असते…
तिचा अपमान कुणी करू नये….
आई म्हणजे परिपूर्ती असते..
ओंजळ तिची कधी रीती नसते……
आई नावाची जादू असते…
भीती पल्याड तिची सावली असते….
आई प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे नसते…
आशीर्वाद स्वरूप ती कायम हृदयी वसते….
प्रत्येक जन्माला येणाऱ्या स्त्रीला आईचा किताब मिळालाच हवा….दुर्देवाने जर काही अडचण आली तर तिने दत्तक घेऊन आईपण जरूर अनुभवावे…तो तिचा हक्क आहे, हे सर्वांनी लक्षात घेऊन तिच्या पाठी उभे रहावे.
तर आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मी अशा सर्व मातांना त्यांच्यातील ” आई ” तत्वाला आजची माळ अर्पण करते.
‘मातृदेवो भव ‘
“या देवी सर्वभुतेषु, मातृरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः” ॥
……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
१८/१०/२३

.

Posted in लेख, स्वरचित...

नवरात्र तिसरी माळ…

(३)
तिसरी माळ……
नवरात्र दुसरे वर्ष….
मला भावलेलं स्त्रीत्व
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…
नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।
|| तृतीय देवी चन्द्रघण्टा नमस्तुभ्यम ||
देवी चन्द्रघण्टा॥
“पिण्डजप्रवरारूढा चन्दकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यम् चन्द्रघण्टेति विश्रुता”॥३॥
अर्थ…. भगवती दुर्गा तिच्या तिसर्‍या रूपात चंद्रघंटा नावाने ओळखली जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी त्यांच्या मूर्तीची पूजा केली जाते. त्यांचे स्वरूप अत्यंत शांत आणि लाभदायक आहे.त्याच्या कपाळावर घंटागाडीच्या आकाराचा अर्धचंद्र आहे.

आज मी भाजी मार्केट मध्ये गेले होते. तिथे माझ्या ठरलेल्या बाईकडून भाजी घेत असताना तिची छोटी नात पाटीवर काहीतरी गिरवित बसली होती….. मी कुतुहलाने तिला म्हणाले,
‘ काय करते बाळा?’
‘ अब्यास..’
मला छान वाटले.मी आमच्या बाईला म्हणले, ‘ शाळेत जाते का?’
‘ नाईओ…शाळा कुठली.. मोट्या बहीनीच बगुन काढतिया कायबाय…’
मला कौतुक वाटले. खरचं आज या क्षणाला कितीतरी स्त्रिया शिकल्या, सवरल्या, आणि आपल्या पायावर ठाम उभ्या राहिल्या. अगदी तळागाळातील पोरी ही शिकत आहेत, मनानी आवड जोपासत आहेत…आणि घरचे ही प्रोत्साहन देत आहेत.
या सगळ्यांचं श्रेय जातं ते म्हणजे, आमच्या सावित्री आणि ज्योतिबा फुले या दाम्पत्याच्या प्रयत्नांना. त्यांच्या अथक प्रयत्न आणि घेतलेले काम पूर्ण करण्याची जिद्द यांना माझा मानाचा मुजरा..
आज या सावित्री बाईंचेच उपकार म्हणून आपण स्त्रिया शिकलो, घराबाहेर पडलो, बाहेरची दुनिया किंवा जग स्वतःच्या सामर्थ्याने बघतो आहोत…त्यात मिसळत आहोत..आज आपल्याला त्यासाठी कुणाची कुबडी घ्यायची गरज पडत नाहीये.
आज आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग आहेच…
कामकरी शेतकरी,कर्मचारी ते पायलट, ड्रायव्हर, शास्त्रज्ञ, अंतराळवीर, वैमानिक…ई…अनेक अनेक क्षेत्रात आज स्त्रिया दिसत आहेत. रिक्षा, रेल्वे, ट्रक तर ती लीलया चालवते…पण विमान रॉकेट ही ती सफाईने हाताळते.
आज चंद्रावर जे चांद्रयान३ सोडण्यात आले, त्यात स्त्री शास्त्रज्ञांचा सहभाग बघता थक्क व्हायला झालं.
कल्पना चावला और सुनीता विलियम्स या महिला अंतराळवीर तर आपण जाणतोच.

तसेच करोना काळात ज्या प्रतिबंधक लसींची निर्मिती आणि संशोधन करण्यात आले त्यात जवळ जवळ ८०%स्त्रियांचा सहभाग होता. आता त्याच पुढचा व्हायरस निफास वर लस शोधत आहेत.
क्रांती तर झालीच आहे..पण ज्या हिरीरीने स्त्रिया शिकत आहेत…पुढे येत आहेत ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आज १०वी आणि १२ वी किंवा इतर स्पर्धात्मक परीक्षेत स्त्रियाच अव्वल स्थानावर असलेल्या दिसतात. कलेक्टर, पोलीस खाते,आमदार, खासदार. …इंदिरा बाईंनी १० वर्ष पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार उत्तम रीतीने संभाळला…प्रतिभा ताई पाटील यांनी राष्ट्रपती पद भूषवले…एवढेच नाही, तर देशाच्या सर्वोच्च स्थानावर आज एक आदिवासी क्षेत्रातील स्त्री असलेली दिसतेय. आपली मान अभिमानाने वर जाते यात वाद नाही.
आज स्त्री वर समाजात ज्या प्रमाणात अत्याचार होण्याच्या बातम्या आपण वाचतो, मन विषण्ण होते ….कारण स्त्री ही किती ही कर्तबगार असली, तरी शारिरीक दृष्ट्या ती थोडी कमजोर, किंवा प्रतिकार करायला कुठेतरी कमी पडतेय याची खंत वाटते.निसर्गाने नवीन पिढी घडवण्याची कुस ज्या स्त्रीला दिली , त्याचा अभिमानाने सन्मान व्हायला हवा…पण काही नराधम त्याच कुसेचा घोर अपमान करून तिला जगणं नकोस करतात….आणि मग कुठे तरी दुर्गेचा वारंवार जन्म होताना दिसतो. आता स्त्री सबला होत आहे…स्वत:चे संरक्षण करायला समर्थ बनत चालली आहे….आणि हे प्रगतीच्या दिशेला पडत जाणारेच पाऊल आहे.
लहान बालिकेपासून ते वृद्धे पर्यंतची स्त्री आज ही नराधम पुरुषांची शिकार होताना देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतेय…त्यांना न्याय मिळवताना होणारा त्रास दिसतोय….पण या वरच्या समस्येवर तोडगा मात्र अजून दिसत नाहीय.तो ही निघेलच.
पण मला खात्री आहे.स्त्रियांची प्रगती जी आज होत आहे…ज्या पद्धतीने आज त्या स्वतःचा उध्दार स्वतः करत आहेत, प्रगतीच्या दिशेने ज्या वेगाने त्या पुढे मार्गक्रमण करत आहेत,जी गती पकडली आहे…त्यावरून निश्चितच त्याच एकेदिवशी या समस्येवर मार्ग शोधून काढतीलच…एकेकाला अशा नरकयातना भोगायला लावतील, की परत असे अत्याचार करायला कोणताही नराधम पुढे अस्तित्वात येणार नाही आणि राहणार ही नाही.

आज भारतीय स्त्रियांच्या बाबतीत बघायला गेलं, तर एक काळ असा होता, की घराच्या चौकटी बाहेर त्या कधी पडत नव्हत्या. आपले घर,आपला परिवार आणि मुलांची देखभाल, स्वयंपाक एवढेच विश्व होते त्यांचे.पण आज याच भारतीय स्त्रिया देशाच्या सीमेवर बाहेरच्या शत्रूंपासून भारताचे रक्षण करत आहेत. आज अभिमानाने सांगावेसे वाटते ,की भारतीय सेनेत आज कित्येक महिला आज उच्चपद भूषवित आहेत.काही महिला वायुसेनेत दमदार लडाखू विमान उडवत आहेत, तर काही नौदल सेनेच्या वेशात भारताचा गौरव वाढवत आहेत.
आज मिल्ट्री, पोलिस खाते , अशी देशसेवेची खाती सुद्धा स्त्री समर्थपणे स्विकारत पेलत ही आहेत. किरण बेदीला आपण सर्वजण ओळखतोच.
आपण अंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करतो …त्यावेळी या स्त्रियांचा गौरव होतो.
International Women’s Day 2023 Indian Army Female Officers:
पहली महिला लेफ्टिनेंट जनरल पुनीता अरोड़ा,
पहली शहीद महिला किरण शेखावत,
पहली महिला एयर मार्शल पद्मावती बंदोपाध्याय,
कारगिल गर्ल गुंजन सक्सेना,
स्वॉर्ड ऑफ ऑनर प्राप्त पहली महिला कैडेट दिव्या अजित कुमार….
ही यादी वरचेवर वाढतच जाईल यात शंका नाही.
आजच्या या रणरागिणी उद्याची समस्त स्त्री वर्गाला मिळालेलं देणं असेल,
यात वाद नाही. नवरात्रीत या नऊ रुपापैकी या रणरागिणी रुपाला माझा त्रिवार दंडवत

“या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”
……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर

१७/१०/२३

भारतीय सेनेतील महिला अधिकारी
Posted in लेख, स्वरचित...

नवरात्र आजची दुसरी माळ…

(२)

दुसरी माळ………
मला भावलेलं स्त्रीत्व🙏
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏

नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।


|| द्वितीय देवी ब्रह्मचारिणी नमस्तुभ्यम ||🙏

“दधाना करपद्माभ्यामक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा”॥२॥

अर्थ…..
अतिशय अवघड तपश्चर्या केल्या नंतर फळ प्राप्ती देणारी देवी ब्रह्मचारिणी आम्हां सर्वांना आपले संकल्प पूर्ण करण्याची शक्ती देवो..🙏

आज काल या मोबाईल मुळे वाचन संस्कृती लयास जाते की काय असे वाटते. पूर्वी अधाशा सारखी मी पुस्तक अक्षरशः खायची …एकदा वाचायला बसले की संपवूनच उठायची .. पुस्तकातला किडाच म्हणा न….पण आता पुस्तक लायब्ररी घरी पाणी भरतेय…पण वाचायला वेळ नाही…का तर हा मोबाईल….आता सुध्दा त्यावरच लिखाण करतेय…अगदी जीवनाचा अविभाज्य भागच झालाय म्हणा न…!
असो…सांगायचा मुद्दा हा, की आता मोबाईल वरून गुगल सर्च करताना मला रामायणातील उर्मिला भेटली. कैकयी आणि कौसल्या माताही.
उर्मिला म्हणजे सीता ची धाकटी बहीण आणि लक्ष्मण याची बायको. जसे लक्ष्मण याचे रामावर प्रेम होते, तसेच हिचे सीतेवर प्रेम होते. हिंदू धर्मात पतिव्रता मध्ये हिचे नाव अग्र स्थानी आहे . महान स्त्रियांमध्ये हीची गणना होते हे आपल्याला माहीत आहे .
असे का?…याचे उत्तर शोधताना मला असे आढळले, की ज्यावेळी लक्ष्मण राम आणि सीतेसह वनवासाला निघाले, तेव्हा उर्मिला त्याच्याबरोबर येण्यास तयार होती. परंतु त्याने संकोच केला आणि आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घेण्यासाठी तिला अयोध्येत थांबायला सांगितले. असे म्हणतात की मग जेंव्हा लक्ष्मण वनवासात जाताना तिचा निरोप घ्यायला आले,तेंव्हा ती राणी वेशात नटून थटून सामोरी आली.तेंव्हा लक्ष्मण प्रचंड संतापला व तिला कैकयीची उपमा देऊन अपमानित केले पण उर्मिलेला तेच हवे होते,कारण आपला तिरस्कार केला, आपल्या पासून लक्ष विचलित झाले, तरच आपल्या भावाची आणि वहिनीची उत्तम काळजी हे घेऊ शकतील.
ज्यावेळी वनवासात राम सीता आणि लक्ष्मण शिक्षा भोगत होते…त्या १४ वर्षाच्या काळात लक्ष्मण एक रात्र ही न झोपता भावाचे व वहिनीचे रक्षण करत होता. निद्रादेवीच्या वरा मुळे हे शक्य झाले होते ..पण ही झोप कुणाला तरी देणे क्रमप्राप्त होते म्हणून ती जबाबदारी उर्मिलेने स्वीकारली होती…म्हणून उर्मिला रात्री स्वतः ची झोप घ्यायची आणि दिवसभर लक्ष्मण याची रात्रीची झोप पूर्ण करायची .म्हणून उर्मिला या अतुलनीय बलिदानासाठी उल्लेखनीय आहे, ज्याला ‘उर्मिला निद्रा’ म्हणतात.
किती तो त्याग…आणि नवरा असून नसल्यासारखे हे १४ वर्षाचे जगणे.
माझ्यासाठी ती एक आदर्श पतिव्रता आहे.
आज समाजात आपण अशा अनेक स्त्रिया बघतो ज्यांचे पती देशसेवेसाठी सीमेवर लढत आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, कारण भविष्य माहित असताना सुद्धा या स्त्रिया त्यांना आपले पती म्हणून स्विकारतात…एवढेच नव्हे तर आपली मुले सुध्दा त्या देशसेवेसाठी तयार करतात. या सुद्धा उर्मिले पेक्षा कमी नाहीत.सलाम अशा स्त्रियांना.
मला अशा स्त्रियांना सुध्दा सलाम करायचा आहे या निमित्ताने, की ज्यांचे पती संसार अर्ध्यावर सोडून कायमचे निघून गेलेत . काही वर गेले , तर काही घटस्फोट देऊन गेले…..पण या स्त्रिया न हारता परत समाजात ताठ मानेने उभ्या राहतात. आपल्या पायावर उभ्या राहतात. मुलांना चांगले संस्कार देत कुटुंबाला सावरतात… काही एकट्या राहतात आणि स्वाभिमानाने जगायचा प्रयत्न करतात….आज या समाजात स्वबळावर ठाम पणे सन्मानाने समाजात उभ्या आहेत.कष्ट करत आहेत.

आज विधवा महिलेला ‘ विधवा’ म्हणायचे म्हणजे, हे कोत्या मनाचे लक्षण मानले जाते. आज अशा भगिनी स्वत:ला पूर्वीसारखे कोंडून न घेता बाहेर पडत आहेत, समाजात मिसळत आहेत ..आणि समाज ही विशेषत: समाजातील प्रत्येक स्त्री तिचा आदर करत आहे ..ही समाजाची झालेली मोठी प्रगती आहे..क्रांती आहे. तिला हात देऊन समर्थपणे बरोबरीने कार्यरत आहेत.आज समाजाचा समाजाकडे बघण्याचा पूर्वीचा दृष्टिकोन मोडत, समाज प्रगति कडे वाटचाल करत आहे ..आणि हा शिक्षणाचाच प्रभाव आहे..स्त्री शिक्षित झाल्याने विचारांची नवीन दिशा ती स्विकारत , आत्मसात करत आहे .
पूर्वी विधवा किंवा घटस्फोटीत महिलांची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात खूप फरक पडत आहे . आज घरचे, सासरचे या मुलींसाठी परत एकदा लग्न लावून तिला स्थिरता देत आहेत ..हा समाजातील बदल निश्चितच कौतुकास्पद आहे.
समाज चांगला आणि वाईट दोन्ही ही प्रकारचा आहे…दोन्ही प्रकारचे अनुभव या स्त्रिया घेतात. काही तोंड दाबून सहन ही करतात, काही विरोध दर्शवुन मुकाबला ही करतात…ही लढाई ती एकटी स्त्री भोगत असते….पण जगायचं कसं हे शिकत जाते…. पावला पावलावर विकृत नजरांचा सामना करते ती…पण हार मानत नाही…
आज या स्त्रियाच आपला आदर्श आहेत. या आपल्याला उर्मिलेची आठवण करून देणाऱ्या आहेत, म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
अशा या स्वतंत्र पण एकट्या जीवन जगणाऱ्या, तसेच ताठ मानेने स्वाभिमानाने समाजात आपले स्थान निर्माण करणाऱ्या, असंख्य माता भगिनींना ही दुसरी माळ मी अर्पण करते….

‘अबला नहीं, हम सब सबला हैं|
नारी ही हैं, पर सभी चिंगारी हैं||’

“या देवी सर्वभूतेषू तुष्टी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः”

……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर

१६/१०/२३

Posted in लेख, स्वरचित...

नवरात्री…पहिली माळ

(१)
नवरात्र दुसरे वर्ष….
पहिली माळ……
मला भावलेलं स्त्रीत्व
नवदुर्गाच्या मंत्र व नऊ स्तोत्रांसहित…

नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।

|| प्रथम देवी शैलपुत्री नमस्तुभ्यं ||
“वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम्।
वृषारूढाम् शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम्॥”

अर्थ…..मनोकामना पूर्ण करणाऱ्या मस्तकी अर्धचंद्र धारण केलेल्या नंदिवाहन आणि त्रिशूल धारण करणाऱ्या शैलपुत्री देवीला नमस्कार असो.

एकदा पुण्याहून मी जयसिंगपूर ला येत होते..खंबाटकी घाटात मला एक सुरेख दृश्य दिसले.एक साधारण 32/35 वयाची स्त्री जीन्स आणि लाँग कुडता त्यावर ओढणी एका बाजूने घेऊन बांधलेली… आणि त्या ओढणीच्या आधाराने पाठीमागे 7/8 वर्षाचे मुल बांधले होते. विशेष म्हणजे ती मुलगी मोटरसायकल /यामाह ऐटीत चालवत होती. मला खरचं खूप कौतुक वाटले.मला ती घोड्यावर बसलेली आणि हाती तलवार घेऊन बाळासह चाललेली वीरांगना झाशीची राणी वाटली क्षणभर….
किती तरी वेळ तिच्यात माझा जीव गुंतला होता… विचार करत होते मी. मोटरसायकल चालवत मुलांना एका गावाहून दुसऱ्या गावी नेणे, सुरक्षा म्हणून ओढणी ने बांधणे …फारच कौतुकास्पद आहे हो हे….!
आज या मुली रॉयल इन्फिल्ड सारख्या गाड्या चालवत एकट्या लेह लडाख सारख्या सफारी करतात.
आज खेडेगावातील नऊवारीतील स्त्री सुध्दा मोटारसायकल चालवतात .
पूर्वी स्त्रियांना घरा बाहेर पडायचे म्हणले की पायी पायी जायचे किंवा सायकल, रिक्षा, बस नाहीतर घरातील भाऊ, मुलगा किंवा नवरा यांच्या बरोबर स्कूटरवर नाहीतर मोटर सायकलवर बाहेर जायचे… एवढाच पर्याय असे.
आज जग खूप पुढे गेलं आहे. त्या बरोबर स्त्रिया ही प्रगती पथावर मार्गक्रमण करत आहेत. १९९३साली गिअर शिवाय गाड्या बाजारात आल्या आणि क्रांती झाली. महिला स्वावलंबी झाल्या त्यामुळे. टू व्हीलर गाडी स्वतः चालवू लागल्या. पहिली सनी आली, मग स्कूटी..आणि मग स्कूटी पेप ने तर बाजारच उचलला…त्यानंतर असंख्य गाड्या आल्या आणि घराघरात स्त्रियांसाठी बाहेर पडायचा मार्ग खुला झाला…स्त्रीचे स्वातंत्र्याच्या बाजूचे अजून एक पाऊल पुढे पडले.
आज आपण बघतो, आई आपल्या मुलांना गाडीवर एकटी शाळेत, ट्यूशन, खेळायला, हिंडवायला ई. यासाठी सोडू..आणू शकते..बाजारहाट,नोकरी आनंदाने गाडीवर एन्जॉय करू शकते.आता ती कुणावर आणि कशावर ही अवलंबून राहत नाही. त्यामुळे तिच्यात एक आत्मविश्वास ही आला आहे.
आज तर या टप्यावर आपण आलो आहोत, की गाडी ही जीवनावश्यक बाब धरली जाते.
मी तर या प्रक्रियेची सुरुवाती पासूनच साक्षीदार आहे…अगदी सायकल वर फिरण्याची आमची पिढी….सायकलवरून फिरायची ती हौस ,त्या सफरी, सायकल लावून गप्पा मारणे, सायकल शर्यत….हे आम्ही कॉलेज पर्यंत एन्जॉय केले…नंतर बस मधील मैत्रिणीनं बरोबर एकत्र प्रवास…घरचा स्टॉप येऊ पर्यंत बोरं , चिंचा,आवळे ,कणीस यांचे बस मधे होणारे सामुहिक खाणे…..हे सगळे खूप एन्जॉय केले आहे..
माहित नाही आजच्या मुली हे सर्व करतात का….कदाचित त्यांच्या एन्जॉय करण्याच्या व्याख्या बदलल्या असतील…पण आज मार्क मिळवण्याच्या शर्यतीत आमच्या पीढी सारखा आनंद त्या घेत असतील की नाही माहीत नाही.पण असो..तर सांगायचा मुद्दा हा की सायकल पासून सुरू झालेला आमचा प्रवास गाडी टू व्हीलर ते फार व्हीलर पर्यंत सुकर झाला आहे…आज आम्ही कोणतीही गाडी चालवू शकतो.
आजच्या मुली या रणरागिणी आहेत. आरेला ..कारे म्हणण्याची हिंमत त्यांच्यात आहे,जी आमच्यात क्वचित असायची….नाहीच म्हणले तरी वावगे ठरणार नाही. कोणताही अन्याय आज त्या खपवून घेत नाहीत ..न घरात..न बाहेर ..तसेच एका वेळी त्या अनेक कामे उत्तम करू शकतात. मल्टीटास्किंग हा त्यांच्या अंगवळणी पडलेला गुण आहे …भले स्वयंपाक येत नसेल नीट, पण जीवन उत्तम कसं जगायचं याचा मार्ग त्यांनी शोधलाय . मुलांना स्वतंत्र वाढवतात ..नोकरी निमित्त स्वतंत्र राहतात. त्यामुळे मुलांना ही एकटेच वाढवतात….त्यांचा अभ्यास, छंद, खेळ, आणि स्वतःची कामे ऑफिस…अशी तारेवरची कसरत करत असतात ….

आज सासू असलेल्या पिढीवर खूप महत्वाची जबाबदारी आहे.आजच्या पिढीला हे कळत नाही, ते कळत नाही ; म्हणून त्यांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा त्यांचे कौतुक करायला हवे..दोन पिढीतले अंतर समजून घेऊन त्यांना त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. टोमणे मारणे बंद करायला हवे ..जिथे कमी तिथे आम्ही म्हणून योग्यवेळी त्यांच्या मदतीला धावून जायलाच हवे ..
अनाहुत सल्ले देत बसणे, आमच्या वेळी असं नव्हतं , तसं नव्हतं म्हणतं त्यांना सतत उपदेश देण्या पेक्षा, त्यांनी विचारले तर जरूर सल्ला, मार्गदर्शन करायला हवे…
आपण आपली ओळख, आपला सन्मान आपण स्वतः जपायला हवा…तर आपला मान राहील….
जो पर्यंत शक्य आहे तो पर्यंत आपण आपले कार्यरत राहायचं प्रयत्न करायला हवा ..फिरणे चालू ठेवावे .
मग हम किसीसे कम नहीं….असे आपल्याला ही वाटलचं पाहिजे ….आपला घरच्यांना त्रास होणार नाही, ही सिनियर लोकांनी काळजी घ्यायला हवी….तर आपण हवेसे वाटू शकतो..याची जाणीव हवी.
तर जगायची नवी उर्मी मिळते …..
आज या तरुण मुलींचे कौतुक करताना आपण ही आपले कौतुक करायचे …
आपल्या नावावर एक ठपका ठेवला जातो…तो म्हणजे…
‘ बाईच बाईंची शत्रू असते..’ मला वाटतं आता हा ठपका या नवीन पिढीने पुसायला हवा…करा एकमेकींना मोठं…काही बिघडत नाही …स्त्री ही प्रत्येक घराची लक्ष्मी असते, तशीच ती समाजाची पण आदर्श असते…प्रत्येकीत कोणता न कोणता गुण असतोच असतो …तो ओळखा…त्याचे कौतुक करा…बघा आपोआप तुमचे ही एकदिवस कौतुक होईल…नाही झाले तरी हरकत नाही ..आपल्याला स्वत:ला तरी आपले कौतुक असतेच…नव्हे असायलाच हवे…
दिवसातील एक वेळ तरी आपण आरशात स्वतःला पहावे…कोणतेही वय असू दे मग..! दिसते कशी मी…या बरोबर मी किती सुंदर आहे ..मी हे करू शकते, मी ते करू शकते …म्हणत स्वत:चे कौतुक स्वतःच करा…बघा नक्की फरक पडतो..
नवरात्रीत आजच्या या पहिल्या दिवसाची माळ ओढताना ती आपण स्वतःलाच अर्पण करुयात….
स्त्रित्वाचा आदर म्हणजे समस्त स्त्रियांच्या देवत्वाची पूजा…
‘ स्त्रित्वाची जेथ प्रचिती,
तिथे कर माझे जुळती…’
आज घरी दारी स्त्री ही लक्ष्मी रूपाने जन्म घेतेय,लक्ष्मी रूपाने वावरते….तिचा सन्मान करायला हवा…तिचा आदर व्हायलाच हवा.

” या देवी सर्वभूतेषू लक्ष्मी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः”
……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर.

Posted in लेख, स्वरचित..., Uncategorized

घर जेंव्हा बेघर होते…..

महाराष्ट्र पत्रकारसंघ जनमंगल मध्ये माझा प्रसिद्ध झालेला लेख👍😊

“घर”च जेंव्हा “बेघर” होते……

“घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती”…….

ही कविता खूप काही सांगून जाते. घर म्हणजे नेमकं काय, तिथे प्रेमाला, मायेला किती महत्व आहे यावर ही कविता भाष्य करते.
किती सुंदर अर्थपूर्ण रचना आहे ही. ‘घर’ हा शब्द केवळ दोन अक्षरी, पण त्या दोन अक्षरांना आपल्या प्रत्येकाच्याच जीवनात महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या प्रत्येकाच्या मूलभूत गरजांपैकी महत्वाची एक गरज म्हणजे घर.नात्यांनी बांधलेले घर हवे..माणसांनी भरलेले,जिथे गोकुळ सतत नांदत असते,आल्यागेल्यांची लगबग घरातील प्रत्येक भितींना जाणवत असते….ते असते खऱ्या अर्थाने “घर”.
आपण सर्वांनीच अनुभवले आहे असे घर….परिपूर्ण घर.
स्वतःच असं सुंदर घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. ते प्रत्यक्षात साकार होतं, तो क्षण म्हणजे सुवर्णाक्षराने कोरलेला क्षण असतो..संसार फुलतो, वेलीवर सुंदर फुले येतात,ती वाढतात,मोठी होतात….तेंव्हा प्रत्येक क्षणाचा साक्षीदार हे “घर”असते..कधी कधी वाईट प्रसंग सुद्धा त्याच्या वाट्याला येत असतात,पण घरातील माणसांमुळे,त्यातील नात्यांच्या ओलाव्याने ते पुसट होत,परत तरारून आनंदी होतात..त्या क्षणांना ती वास्तू “तथास्तु”म्हणते…पुढे चालत रहा..मी आहे..हेच कदाचित ती सांगत असावी..
हळूहळू काळ पुढे सरकतो,आणि ती घरची फुले शिक्षणामुळे किंवा लग्न संस्काराने घरापासून किंचित दूर जातात…तेंव्हा आशीर्वादाने आपले हात त्यांच्या डोक्यावर ठेवून “घर” ही हेच म्हणते “तथास्तु”….आशीर्वाद खोटा होत नाही म्हणतात,तसे दुर्देवाने म्हणावे वाटते की,ही बाहेर पडलेली मुले बाहेरच पडतात,ती बहुदा कायमचीच..ते ही आपले घरकुल बांधतात,आपले विश्व उभे करतात..जणू एक घर दुसऱ्या घरास खो देते..कालांतराने “मूळ” ही म्हातारे होते,व्याधी लागतात ,किंवा गरज म्हणून स्थलांतर करतात,आणि मग ते “घर” दुर्देवाने “बेघर”होते…आपल्या माणसांपासून दूर म्हणून ते बेघर..दुसरा कुणी मालकी हक्क गाजवतो त्यावर पण ते आपल्या दृष्टीने कायमचे पारखे होते..अशी एकेक घरे जी आपले आजोळ, गावाकडचे घर, जेंव्हा बेघर होते,तेंव्हा परत जाऊन ही बघणे होत नाही,कारण त्यात पूर्वीचा थाट नसतो,पूर्वीचे हसणे खिदळणे नसते..असते ते फक्त आणि फक्त उदास,केविलवाणी स्थिती….मी अशी तीन घरे पाहिलीत स्वतःची..माझे आजोळ करमाळा,गाव आटपाडी आणि आई बाबांचे सोलापूर…प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः त्या घराचा एक भाग बनलेलो असतो,तोच आपला कुणी तरी ऑपरेशन करून खुडून टाकावा तसा,गळून पडतो तो कायमचाच…ज्याची प्रत्येक वीट बसताना आपण पहातो,रोज पाणी मारून मजबूत करण्यास आपण प्रयत्न केलेला असतो,ते घर सजवतो,फुलवतो,ती वास्तू म्हणते, “मी राहिले रे मजबूत,पण तूच हारलास.”
आज कित्येकांना हा अनुभव आला असेल की,खरचं! त्या घरी किती मस्त वाटत होतं,किती अनुभव एकमेकांबरोबर आपण शेअर केले,छोटं होतं, पण सुख नांदत होतं; ते सुख आज या हवेलीत ही नाही…
आज असे अनेक मोठ-मोठाले वाडे ओस पडलेत. नुकतेच आपण ऐकले R K , किंवा जयप्रभा स्टुडिओ सारख्या मोठ्या वास्तू ही बेघर झाल्यात…
खेड्यातून शहराकडे ओढा असल्याने जुनी खेडी च्या खेडी बेघर होताना दिसत आहेत….

आज “सेकंड होम” नावाची संकल्पना अस्तित्वात येतेय..उच्च मध्यमवर्गीयांकडून ती आता मध्यमवर्गीयांपर्यंत आलेली आहेच…म्हणजे दोन घर. एक रहाते घर आणि एक इन्व्हेस्टमेंट घर…ते भाड्याने दिले जाते किंवा कुलूपबंद अवस्थेत राखले जाते…पण त्यात ओलावा असतो का मायेचा?
आज परदेशी स्थायिक लोक इंडियात आमचे घर आहे,ते ही अमक्या अमक्या ठिकाणी म्हणून शेखी मिरवत सांगत असतात…पण स्वतः किती ते त्या घरासाठी राबतात?नुसते पैसे फेकले अन इकडे घर विकत घेतले,एवढेच त्यांचे त्यातले कॉन्ट्रीब्युशन. आज मुंबई,पुणे,बेंगलोर अशा ठिकाणचे सर्वेक्षण केले तर असे आढळून येते की, घरटी प्रत्येक एकजण परदेश वासी आहे..आणि छोट्या गावांची गणती ही काही या बाबत कमी नाहीच आहे…म्हणजे त्यांचे मागे उरलेले आई बाप त्या घराची काळजी घेतात,फक्त जिवंत आहेत तो पर्यंत..नंतर ती वास्तू अशीच कधीतरी लिलावात निघते,बेघर होते… नात्यातला ओलावा कुठे तरी संपून जात आहे, कोरडेपणा वाढत आहे,हे अतिशय विदारक सत्य समोर येत आहे. निदान प्रौढ व्यक्तींनी आता याची धास्ती घेतलीय असे चित्र दिसतंय..आज मी जे घर उभे केले , ते मला एक दिवस असेच सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे, याची मानसिक तयारी करत आहेत..मग मुलांकडे जावे लागेल नाहीतर, वृद्धाश्रमात तरी…कारण एकटे रहाणे हे काही कालांतराने अशक्यच असते….
म्हणून मी “बेघर” माणसे होतात असे न म्हणता “घरे”च “बेघर” होत आहेत, असे म्हणणे योग्य समजते..नव्हे ते संयुक्तिक आहे असे मला तरी वाटते…आपणास ही असे वाटते का हो?

नक्की विचार करा की,नेमके “बेघर” कोण होत आहेत?

पल्लवी उमेश
‘चिन्मय’ शाहूनगर.जयसिंगपूर.