Posted in लेख, स्वरचित...

नवरात्र आजची नववी माळ.

आजची शेवटची नववी माळ….🙏🙏

(९)
नववी माळ…
मला भावलेलं स्त्रीत्व🙏
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏


नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।

||नवमं देवी सिद्धिदात्रि नमस्तुभ्यं ||🙏
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धिदा सिद्धिदायिनी ॥९॥

अर्थ….
देवी सिद्धदात्री जी सिद्ध, गंधर्व, यक्ष, देव, दानव यांच्या द्वारे पुजली जाते. देवीच्या हाती शंख,चक्र, गदा आणि कमळ आहेत.सर्व सिद्धिंची दाता आणि त्यावर विजय प्राप्त करणारी हे देवी! माझ्यावर आशीर्वाद आणि कल्याण प्रदान कर.

माझ्या नात्यात नुकतीच एक नवीन सून दाखल झाली होती.उच्च शिक्षा विभूषित आणि जॉब करणारी. लग्नानंतर दोन महिन्यांनी ती जॉबला जाऊ लागली. मग घरात तिच्या जॉब मुळे, वेळां मुळे कुरबुरी सुरू झाल्या. सगळं आवरून ती जायची , पण सासू आणि सासरे दोघे नाराजी दाखवू लागले. पुढे वर्षभरात बाळाची चाहूल लागली….जस जसे दिवस पुढे सरकू लागले, तस तसे घरात हिच्या जॉब चा विषय चघळायला सुरुवात झाली..बाळ झाल्यावर आम्ही नाही जबाबदारी घेणार…तू सोडूनच दे जॉब…असं रोज रोज विषय निघून वाद वाढतच होते…..

माझ्या कानापर्यंत आलेच होते, पण आपण विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये …या विचारांची मी म्हणून गप्प बसले…पण माझी लेखणी कुठे गप्प बसायला तयार होती. मनातले विचार आपण उतरून काढू, म्हणजे निदान कुणा एकाला जरी याचा फायदा झाला तरी, लिखाण सार्थकी लागल्या सारखे वाटेल..

आपल्या स्वत:च्या घराचा पाया मजबूत असेल, तर इतर नाती कशी असावी या बोलण्याला अर्थ आहे. आता आजचा शेवटचा हा लेख या वरच आहे.
” घरात सुख, तर बाहेर सुख..”
बघा तुम्हांला तरी माझे विचार पटतात का ते.. अर्थात दोन्ही बाजूंनी मी लिहायचा विचार करते आहे बरं !…..

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः

या मनुस्मृति च्या वचना मध्ये असे सांगितले आहे की,ज्या ठिकाणी स्त्री ची पूजा म्हणजेच मानसन्मान होतो,तिथेच देवता वास करतात.

आज 21 वे शतक चालू आहे.मागील अनेक वर्षांपासून स्त्री च्या मध्ये आमूलाग्र बदल होत जाताना दिसतोय.पूर्वीची अबला स्त्री आज सर्वार्थाने सबला बनलेली दिसते..यातच तिची खऱ्या अर्थाने जीत झालेली दिसते…मग या मागे कोण कोण होते,इतिहास काय सांगतो….हा सर्व विषय वेगळा आहे..आपण आज या सबला स्त्री विषयी जरा आत्मचिंतन करू या.

नोकरी करणाऱ्या स्त्रीस कुटुंबाचे सहकार्य…….

आज जन्माला आलेल्या बालिकेचे खूप जोरदार स्वागत होते..पूर्वी सारखे हिडीस फिडीस स्वागत न होता ,समारंभ साजरा होतोय.कारण तिची योग्यता आता समाजाला पर्यायाने पालकांना ही समजली आहे…काही ठिकाणी अजून ही याला अपवाद असलेला दिसून येतोय,पण त्या भागाकडे तूर्तास न बघणे योग्य होईल.तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.असो।

आज स्त्री पुरुष हे दोघे ही समान अधिकाराचे मानकरी झालेत. हे दिवस स्त्री ला अनेक संकटांना तोंड देत बघायला मिळालेत.पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ताठमानाने ती उभी आहे..प्रत्येक क्षेत्रात आज तिचा वावर आहे.यशस्वी ही होत स्वाभिमानाने ती मार्गक्रमण करत आहे.

सफाई कामगार पासून रिक्षा..ट्रक चालवणे, विमान, अंतरिक्षात,
बॉर्डरवर, राजकारण,समाजकारण,
डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग ,अशा प्रत्येक क्षेत्रात आज ती उच्च पदावर कार्यरत आहे.या अशा स्त्री ची ही गगनभरारी ही निश्चित कौतुकास्पद आहे..ती हे सर्व करत असताना मात्र हे लक्षात घ्यायला हवे की, पुरुषांच्या मानाने ती एक पाऊल पुढे आहे…कष्ट आणि जबाबदारीच्या दृष्टीने.


स्त्री ही निसर्गतः प्रजननासाठी निर्मिलेली गेली आहे..शिवाय घर ,कुटुंब यात भावनिक दृष्टीने जास्त अडकणारी आहे..घरची जबाबदारी पर्यायाने कुटुंबातील सर्व सदस्य, मुलांचे संगोपन ह्या उत्तम रीतीने सांभाळत,तारेवरची कसरत करत या बाहेरच्या जबाबदार्या पार पाडत आहे.

हे सर्व करत असताना कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य व्यवस्थित असणे अर्थातच आवश्यक आहे.
घरची घडी व्यवस्थित असेल,तरच बाहेरची आघाडी यशस्वी पणे पार पाडता येते.घरात कुरबुर असेल ,तर पुरुष तो मनाचा कोपरा बंद करून बाहेर व्यवस्थित परिस्थिती हाताळू शकतो,पण स्त्री चे तसे नसते.घरात गडबड तर मनात गडबड-गोंधळ. मुलं आजारी असतील तर निम्मा जीव घरात अडकतो. अशावेळी घरातील इतर कुटुंबीयांनी जर घरातील जबाबदारी हसत हसत स्वीकारली,तर ही स्त्री बाहेर विनाटेन्शन काम करू शकेल..
पूर्वी सारखे आता एकत्र कुटूंब पद्धत अस्तित्वात नसली,तरी काही वेळा आपल्याला इतरांची म्हणजे नातलगांची आवश्यकता असतेच.मन फ्रेश होणे, मोकळे होणे ही त्यामुळे घडत असते.. एकमेकांना हवे नको पाहण्याने घरात सकारात्मक लहरी निर्माण होतात, ज्या मन स्वस्थ करण्यास सहाय्यभूत होतात.. अशाने स्त्री मनावर कोणतेही दडपण न घेता बाहेर आपले काम विनाप्रयास करू शकते..
नोकरी करणाऱ्या स्त्रीस जर कुटुंबाचे सहकार्य असेल ,तर एक यशस्वी स्त्री आपल्याला घरोघरी दिसेल…यात प्रामुख्याने नवरा, भाऊ, वडील, मुलगा, मित्र, सहकारी….. ह्यांचे ही योगदान तितकेच महत्वाचे आहे.
कारण हे सर्व कौटुंबिक सदस्यच आहेत..कुणी ही आपल्या आई, बहीण, बायको, सखी हिला कमी न लेखता तिला प्रोत्साहित केले ,तर विनाप्रयास ही ती अर्धी लढाई जिंकते,हे नक्की..

आता मी सासू-सून या विषयावर जास्त भाष्य करणार नाही…कारण पूर्वीच्या सासू आणि आजच्या सासवा यात जमीन आसमांचा फरक पडलाय…आजच्या सासवा या शिकलेल्या,कमावत्या,आणि बाहेरच्या क्षेत्रात अनुभवी असल्याने,काय मनस्थिती असते नोकरी करणाऱ्या बाईची,ते ती उत्तम प्रकारे जाणते.
त्यामुळे आधुनिक स्त्री ने न कळत का होईना पण अर्धी लढाई जिंकली आहे.
स्त्रीला कामासाठी बाहेर पडताना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलत त्याचा तोल संभाळत काम करावे लागते. अशावेळी ती
जैविकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या ही पुरुषांपेक्षा जास्त चिवट असलेली दिसते. अनेकदा तणावग्रस्त परिस्थितीत पुरुषांपेक्षा ती जास्त चिकाटीने तग धरते. त्यामुळे अत्यंत गुंतागुंतीचे मासिकचक्र, गरोदरपण, प्रसूती, पालकत्व, त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची नैसर्गिक ताकद तिच्यात असतेच असते. स्त्रीच्या शारीरिक आरोग्यासह मनाची घडणही गुंतागुंतीची आहे. या सगळ्या रेट्यात तिच्यातील मानसिक समस्या वाढत्या आहेत, का तर आधुनिकतेची आव्हानेच आज एवढी बोजड झालीत की,ती पेलता पेलता आणि या संस्कृतीरक्षकांची मर्जी संभाळता संभाळता तिची शारीरिक- मानसिक दमछाक होते. मात्र या तिच्या मानसिक समस्या ओळखण्याची संवेदनशीलता तिच्या कुटुंबाकडे असेलच, असे सांगता येत नाही…पण संयमाने आणि मोठ्यामनाने तिला आपलंसं करून मी किंवा आम्ही … आहे किंवा आहोत तुझ्या मागे, हा विश्वास तिच्या मनात निर्माण करता आला, तरच ती बाहेरच्या जगातील सर्व समस्यांना किंवा येणाऱ्या चॅलेंजला हसत हसत तोंड देऊ शकते. घरातील मुलांची, सासुसासरे, नणंद, दिर… आले गेले पाहुणे….यात पूर्वीची स्त्री अडकून पडायची..पण आज ती कर्तृत्ववान बनली आहे…तिचे क्षेत्र विस्तारते आहे, शिवाय आर्थिकदृष्ट्या सुद्धा दोघांना घराबाहेर पडणे गरजेचे असल्याने आता तरी ती या घरगुती समस्यांतून बाहेर पडायलाच हवी… त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी तिला मानसिक सपोर्ट अवश्य द्यायला हवा. तिला मान ही द्यायला हवा…तू करतेस ते योग्यच आहे ही जाणीव तिच्या मनापर्यंत पोहचायला हवी …वेळ प्रसंगी तिच्या मुलांचे संगोपन, खाणे पिणेची जबाबदारी ही घेता यायला हवी…उगीच विरोधा साठी विरोध करु नये. अशाने मग मुलं स्वतंत्र राहायचा विचार करतात….कारण सुनेला समजूनच जर घेतले जात नसेल, तर रोज भांड्याला भांड लागणारच. जेवढी मदत करता येईल, झेपेल तेवढी करावी. आजकाल डे-केअर सर्वत्र असतात, पण तिथे किंवा शाळेत सोडणे, आणि आणणे ही कामे सुद्धा करून आपण तिला मदत करू शकतो…
भाजी निवडणे, एखादी दुसरी गोष्ट जमेल तशी करणे…..येवढे तरी करु शकतो आपण ते करावे…
सर्वात महत्वाची भूमिका नवऱ्याला पार पाडायची असते…त्याच्या पूर्ण सपोर्ट ने ती मोकळ्या मनाने बाहेरची कामे करू शकते…

आता हे सर्व मी साधारण विवाहित स्त्री बद्दल लिहिले…पण जी कुणी घरातील मुलगी, आई, वहिनी….या रुपात बाहेरची कामे, नोकरी, व्यवसाय अगदी दुसऱ्या घरची धुणी भांडी, मजुरी स्त्री या….यांच्या ही बाबत माझी हीच भूमिका आहे….

अशा प्रकारे नोकरी करणाऱ्या स्त्रीस कुटुंबाचे सहकार्य असेल तर ती ” मानिनी ” म्हणून स्वाभिमानाने आपली यशस्वी मार्गक्रमण करत राहील हे नक्की..

नोकरी करणाऱ्या स्त्रीची जबाबदारी..

या देवी सर्वभू‍तेषु तुष्टि रुपेण संस्थिता।

आता या नोकरी करणाऱ्या स्त्रीचे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी कसे वर्तन हवे…हे बघू….

सर्व साधारण घरातील स्त्रीचा विचार करता नोकरी करणारी स्त्री ही पुरुषांसारखी स्वतंत्र नसते…मनात आले तर कधी ही बाहेर पडता येत नाही. लग्न न झालेली मुलगी आईवर जबाबदाऱ्या टाकून कदाचित बाहेर पडू शकते, पण तिला ही वेळेची बंधने ही पाळावीच लागतात.
सध्या विवाहित स्त्री बद्दल आपण विचार करत आहोत. घरातील कामे तर कोणत्याही स्त्रीला चुकलेली नाहीत. लग्नानंतर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात नव्याने नाती तयार झालेली असतात. सर्वांची मने सांभाळत संसार करायचा असतो.आजकाल नातीच कमी झाल्याने एखादी नणंद किंवा एखादा दिर आणि सासू सासरे एवढेच. पूर्वी सारखा गोतावळा शक्यतो दिसत नाही..म्हणून जबाबदाऱ्या थोड्या कमी झाल्यात असे म्हणायला हरकत नाही. आज पतीपत्नी या दोघांना नोकरी करावी लागते, नव्हे ती गरजच बनली आहे.आणि योग्य शिक्षण घेतल्याने स्त्रियांनी तरी घरी का बसायचे? तिची इच्छा असेल तर जरूर आपल्या पायावर तिने स्वतंत्र उभे राहायचे तिला स्वातंत्र्य आहेच.

आता हे सर्व करत असताना तिने घरातील सर्व जबाबदाऱ्या तिने कौशल्याने पार पाडायला हव्या. कामांची योग्य सांगड तिला घालता यायला हवी. आपण नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो, कमावतो म्हणजे मी ही ‘कुणी तरी’ आहे , हा मिजास असू नये. किती ही स्वातंत्र्याच्या गप्पा आपण मारल्या तरी घरी स्त्रीचे ‘लक्ष’ असणे, हे कधी ही उत्तम गृहिणीची ओळख आहे. मुलांचे आवरणे, त्यांना वेळ देणे, स्वतःच्या हाताने काही खाऊ करून देणे, अभ्यास घेणे, त्यांच्याशी खेळणे …..हे मातृत्व उपभोगणे आहे…अशाने
‘आई माझी आहे’…हे मुलांच्या मनात कोरले गेले पाहिजे…सर्व कामांना पैसे देऊन बायका मिळतात, पण आई मिळत नसते, हे लक्षात घ्यायला हवे.
सासू सासऱ्या बरोबर पण छान संबंध असायला हवेत…सेवा करायची म्हणजे अगदी सर्व हातात नेऊन देणे, किंवा सतत मागे पुढेच केले पाहिजे असे नाही..तर त्यांचे ही वय होत आले आहे याची जाणीव असणे.आणि येता जाता हसून असावे. चौकशी करावी, मुलांचे आपण आवरून , जेणे करून त्यांना फार करावे लागू नये याची जाणीव असावी. लहान मुले आजकाल डे केअर मध्ये असतात. पण कधी कधी लहान मुले त्यांच्या वर सोडून जायची असतील, तर त्यांचे शी,शू… खाण्याचे डबे तयार ठेवून आपल्या कामाला जावे…जेणे करून सासू सासरे आनंदात राहतील…
घरातून आपल्याला पूर्ण सपोर्ट आहे तर आपण ही एवढे करूच शकतो न?
कधी कधी बाहेर एकत्र जायचा प्लॅन करावा, एखादी दुसरी गोष्ट प्रेझेंट द्यावी….
अशाने प्रत्येकाला आपली ‘दखल’ घेतली जात आहे याचे समाधान वाटते इतकंच…
घराचा , संसाराचा गाडा जर सुरळीत चालायचा असेल, तर घरातील स्त्रीचे योग्य ते योगदान असणे अगदी गरजेचे असते…
घरची स्त्री खूष तर सर्व खूष…
घरातील स्त्रीचे स्त्रीशी नाते गोड, तर सर्व गोड..
म्हणूनच म्हणतात….


“घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम-जिव्हाळा
नकोत नुसती नाती”…….

ही तारे वरची कसरत करतच स्त्रीला आपल्या संसाराचा रथ पुढे न्यायचा असतो…आणि रथ म्हणला, की त्या रथाला संसाराची दोन चाके आलीच…नवरा आणि बायको… ही संसार रथाची दोन चाके. नवऱ्याची उत्तम साथ निभावत अशी स्त्री आपल्या संसारात अत्यंत स्वाभिमानाने आनंदात जगेल यात वाद नाही.

या देवी सर्वभू‍तेषु तुष्टि रुपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||

🙏🙏🙏🙏🙏🙏

……………………………………………………..

©पल्लवी उमेश


जयसिंगपूर
२३/१०/२३

Posted in लेख

नवरात्र…आठवी माळ…

(८)
आठवी माळ……
मला भावलेलं स्त्रीत्व
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…
नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।
||अष्टम देवी महागौरी नमस्तुभ्यम ||

श्वेते वृषे समारूढा,श्वेताम्बरधरा शुचि:।
महागौरी शुभं दद्यात्, महादेवप्रमोददाद।।

अर्थ….. पांढऱ्या शुभ्र बैला वर पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बसलेली अत्यंत पवित्र आणि भगवान महादेवाला आपल्या भक्तीने प्रसन्न करणारी देवी महागौरी आम्हां सर्वांचे कल्याण कर.

मध्यंतरी एका बारशाला जायचा योग आला होता. तुम्ही लवकर या असा आग्रह होता म्हणून मी थोडी लवकर गेले होते. पण तिथे पोहचल्यावर मला वाटले, मलाच उशीर झाला. मग मी आपली कुणी ओळखीचे दिसते का म्हणत इकडे तिकडे नजर टाकत होते. तेवढ्यात बाळाची आजी म्हणजे माझी मैत्रीण आली. मी म्हणले,
” का ग मला उशीर झाला वाटते…सगळ्या आल्या का मैत्रिणी? गर्दी ही खूप दिसतेय मला त्या दिसत नाहीयेत.”…

तशी ती म्हणाली, ” नाही..तूच पहिली आलीस….हा सगळा आमचा नातेवाईकांचा गोतावळा आहे. ये ओळख करून देते.” ….म्हणून छान कौतुकाने हसली.आणि प्रत्येकीची ओळख करून दिली…प्रथम मी खूप सुखावले ते गोतावळा हा शब्द ऐकल्यावरच.आणि नंतर इतक्या नातेवाइकांची ओळख करून दिली ,की काही विचारू नका.मी जेलस फील करू लागले मनात…किती नातेवाईक आहेत हिला..आणि नुसते नाहीत, तर बारश्या सारख्या कार्यक्रमाला सगळे हजर आहेत…खूप कौतुक वाटले.
आपल्या कडे मात्र एखादा कार्यक्रम काढा…येतील का सगळे इतके पाहुणे? ठराविक लोक येतात आणि जातात.
पूर्वी मात्र आपण सण साजरे करू तेंव्हा सर्व हजर असतं..आता कोरोना मुळे म्हणा किंवा काही कारणाने कमीत कमी लोकं बोलवायची जणू पद्धतच झालीय.
कोणताही सण,कार्यक्रम असो घरात स्त्रियांची नटून थटून चाललेली लगबग मात्र हवीच बुआ… अशावेळी सभोवार नजर टाकली की सगळी कडे स्त्री वर्गच उठून दिसतो. त्यांच्या शिवाय कार्यक्रम शून्य. याप्रसंगी त्यांच्या अंगात नवदुर्गाच अवतरत असते. त्यांच्या शिवाय सण हा सण वाटत नाही की उत्सव ही .
आज नवरात्री निमित्त मला आपल्या सर्वांच्या नात्यातील सर्व महिला आठवल्या; ज्या सर्व नवदुर्गा देवीची रूपेच आहेत. एका वेळी अनेक आघाड्यांवर या लढत असतात. एका वेळी अनेक कामे त्या लीलया पेलत असतात . त्यांच्या शिवाय घरात काहीच घडू शकत नाही. घरात बाई नसेल तर ते घर, घर रहात नाही….
१) आजी …..आज आपल्या घरात घराची मजबूत भिंत असलेली आजी हवी असते. ती संपूर्ण कुटुंबाचा कणा असते.तिच्या राज्यात तीच प्रमुख असते.तिची सत्ता जोवर , तो पर्यंत कुटुंब एकसंध असते. दुधावरची साय म्हणत माया करते ,म्हणून सर्व नातवंडे तिच्या सहवासात मजेत असतात…कणखरता हा नारी शक्तीचा गुण तिच्यात ठासून असतो.

२) आई.…आई तर आई असते…आपले घर ती उत्तम सजवते..आल्या गेल्यांच उत्तम स्वागत करते.सण समारंभात स्वत:ला पूर्ण झोकून देते.आई कधी दमत नाही…कारण विश्रांती ती कधी घेत नाही….आजची आई घरात कर्तव्यदक्ष तर असतेच, पण बाहेरच्या जबाबदाऱ्या ही ती आज उत्तम सांभाळते आहे. पूर्वी सारखे ती आज फक्त चूल आणि मूल मध्ये न रमता, आज ती बाहेर सामाजिक कार्य ही करते… समाजकारण,राजकारण, बिझनेस, उत्तम सांभाळते…..कर्तव्यदक्षता हा नारी शक्तीचा गुण तिच्यात मुरलेला असतो.

३). सासू….सासू म्हणजे घरातील जबरदस्त प्रकरण . पूर्वी सासूचा दबदबा असे..त्या म्हणतील तेच घरात होत असे. सासू असे पर्यंत कुटुंब एकमेकांना बांधून असे….आजचे चित्र वेगळे आहे. सासू सासूच असते पण पूर्वी इतकी कर्मठ नसते..आजच्या नवीन सुनांना सासू नावाची दहशत माहीतच नाहीय. ते एका दृष्टीने चांगलेच आहे म्हणा..आपली आजची सासुवाली पिढी खरीच समजूतदार आहे. मला माझ्या सासूने त्रास दिला, म्हणून मी माझ्या सुनेला त्रास देणार, या भंपक विचारातून कधीच बाहेर पडलीय…कारण ती खूप शिकलेली सासू आहे.बाहेरचे जग ही तिने पाहिले आहे. मार्गदर्शकता हा महत्वाचा स्त्री शक्तीचा गुण असतो या व्यक्तीत

४) काकू….काकू हा ही कुटुंबाचा महत्वाचा घटक आहे ..आई बरोबर स्वयंपाक घरात आढळणारी हमखास व्यक्ती. मी हे आताचे चित्र नाही बघत…आता स्वतंत्र राहणीमानाचा फंडा चालुय…ही गंमत या काळातील मुलांना दुर्देवाने नाही बघता येत.पण आम्ही खूप अनुभवले आहे. या काकू नामक व्यक्ती म्हणजे आईचेच प्रतिरूप असल्याने मला आई धरून सात आई होत्या म्हणावे लागेल..आज ही काकुच्या मांडीवर डोकं ठेवून मी पडू शकते…मोठ्या, लहान काकू सर्वांना ‘ए काकू’ म्हणतो आम्ही.. आई सारखेच. जावा जावा अशा बहिणी सारख्याच असाव्यात घरोघरी . तर घर हे घर राहते. एकमेकांना धरून राहते. ,पण या जावा आपापसात कधीच भांडत नसत. एकमेकींना धरून असतं सर्वजणी.. त्यांच्यातील एकसंधता हा नारी शक्तीतील महत्वाचा गुणधर्म आढळतो.

५) आत्या…..आत्या घरातील भाच्यांचा विक पॉइंट. ..घरातील सर्व गोष्टींची बितंबातमी या व्यक्तीकडे असायची. आत्या आमच्यावर आज ही खूप खूप प्रेम करते. आज ८० च्या जवळपास पोचली,थकली असली तरी अधून मधून फोनवर सर्वांची विचारपूस करणारी ही आत्या खूप भारी आहे. सर्वांची लाडकी…या व्यक्तीत लोकप्रियता हा नारी शक्तीचा महत्वाचा गुण आहे.

६) मावशी….मावशी हे एक असे रसायन आहे की आईचे प्रतिरुप जणू…मावशी घरी आली की आईला आणि तिला दोघींना काय करू आणि काय नको असे होई. बोलत बसायचे, की काम करायचे सुचत नसे…..करमाळा आमचे आजोळ…या चौघी जमल्या की आम्ही मुले लुडबुड करायचो त्यांच्यात.मावशी कधीच न रागावणारीच असते. भाच्चे कंपनीवर प्रचंड प्रेम करणारी ही व्यक्ती असते.. त्यांच्याशी मुलं होऊन मिसळते ती. मजा असायची आजोळी एकत्र आलो की….आता या पिढीत या गोष्टी दुर्मिळ दिसतात. पण एखादी मावशी तरी असावी प्रत्येकाला. आता कुटुंबच लहान होत चालली आहेत. निर्मळता हा स्री शक्तीचा गुण असतो तिच्यात.

७) सून ..सून म्हणून घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी ही प्रवेश करते, त्यावेळी खरचं प्रसन्न आणि कृतकृत्य वाटावे.कारण पुढे आपल्या या संसार रथाचे सारथ्य ही जोडीच करणार असते. समजूतदार आणि संस्कारी मुलगी ही सून म्हणून आज प्रत्येक घराची गरज आहे. नवीन नवीन गोष्टी ही घरात करत असते.दुसऱ्या घरातून आलेली, हीच उद्याची आपली वंशवेल वाढवणारी नाजूक वेल असते. नावीन्यपूर्ण हा स्त्री शक्तीचा गुण हीच्यात दिसतो.

८) बहीण ..ज्यांना बहिण नाही ते खरोखर कमनशिबी म्हणते मी..भावाला बहीण,आणि बहिणीला ही एक बहीण असावी…एकमेकींच्या सहवासात वाढणाऱ्या बहिणी खूप नशीबवान असतात. मी या बाबतीत कमनशिबी आहे..आपल्या मनातले बोलायला आई नंतर बहीणच तर असते..आणि ज्या घरात जेंव्हा बहिणीचा वास असतो , त्या घरात रक्षाबंधन, भाऊबिज या सणांचे महत्त्व कैकपटीने वाढते..प्रत्येक बहिणीचे स्वागत माहेरी हसऱ्या चेहऱ्याने झाले, तर ती बहीण लाखमोलाचे सुख पदरी पाडून सुखाने सासरी जाते.बहीण ही खंबीर पणे आपल्या भावंडामागे उभी असते. आई वडिलां नंतर भावाने जमेल तसे तिचे माहेरपण जरूर करावे… प्रेम द्यावे घ्यावे . आजकाल नाती कमी होत आहेत,पण जी आहेत ती तरी आता प्रत्येकाने जपावित. बहीण हा आपला एक हळवा कोपरा प्रत्येकाने जपावा. आल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड देणारी बहीण असते. ही खंबीरता …हीच स्त्रीशक्ती.
९) मुलगी ..मुलीचा जन्म झाला की लक्ष्मी आली म्हणून स्वागत होते. भावाच्या पाठीवर आली तर कोण कौतुक असते…पहिली झाली तर, पहिली बेटी धनाची पेटी…म्हणून स्वागत असते..
आजकाल मुली मुलांपेक्षा सरस असतात..म्हणून दोन ही मुली झाल्या तरी खूप आनंद होतो..दोघी एकमेकींना भारी असतात.आणि दोघी मिळून जग जिंकतात. मी तर म्हणते मुली या मांजरा सारख्या पायात घुटमळत असतात…घरात सतत चिवचिवाट असतो, घराचे चैतन्य असतात मुली. घराला जाग असते एकप्रकारे. ज्या घरात मुलगा आणि मुलगी असतात त्यांना मी काय म्हणते ते लक्षात येइल….मुलीमुळे कन्यादाना चा पवित्र विधी हातून घडतो….प्रत्येक घरात एक तरी मुलगी असावीच…ती शक्ती असते जगायची, उभारी घेते मनाची..ताकद देते जीवन जगायची…
स्त्री शक्ती चे हे लक्ष्मी रूप असते.

या वर सांगितलेल्या सर्व नवदुर्गा प्रत्येकाच्या घरात असतात.त्यांचा सन्मान केला,आदर केला,तरी नारी शक्तीची पूजा केल्यासारखे आहे.
“यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः”
आज आपण हे व्रत घेऊयात ,की घरच्या स्त्री ला कुणीच दुखवता कामा नये..स्त्री ने स्त्रीचा सन्मान करावा..आपापसात मतभेद ठेवू नयेत..एवढेच या नवदुर्गा शक्ती रुपा निमित्ताने सांगते.

या देवी सर्वभूतेषु व्रती-रुपेण संस्थिता |नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
२२/१०/२३









Posted in लेख

नवरात्र ७वी माळ…

(७)
सातवी माळ…….
नवरात्र दुसरे वर्ष….
मला भावलेलं स्त्रीत्व🙏
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏
नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।

| सप्तम देवी कालरात्री नमस्तुभ्यम ||🙏

देवी कालरात्रि॥
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलभ्यक्तशरीरिणी॥
वामपादोल्लसल्लोहलताकण्टकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥

अर्थ……
जिच्या शरीराचा रंग गडद अंधारासारखा पूर्णपणे काळा आहे. डोक्याचे केस विखुरलेले आहेत आणि गळ्यात विजेसारखी चमकणारी माला आहे. काळरात्री ही अंधकारमय परिस्थिती नष्ट करणारी शक्ती आहे. ही अशी शक्ती आहे जी मृत्यूपासूनही संरक्षण करते. जणू ती म्हणते भक्तांनो, सदैव निर्भय राहा.
ती नेहमीच शुभ परिणाम देणारी आई असते. म्हणूनच त्यांना शुभंकारी म्हटले जाते.

काल जवळच्या लक्ष्मीच्या देवळात गेले होते. देवीचे दर्शन घेतले आणि रोजच्या प्रमाणे एक जागा बघून तिथे डोळे मिटून मोठ्याने श्रीसुक्त म्हणत बसले. माझे म्हणून झाल्यावर मी हात जोडून नमस्कार करत असता शेजारच्या बाईचे बाळ माझ्या मांडीवर हात मारू लागले….मला काही कळले नाही.मी तिला घेतले उचलून तर रडायला लागली….तशी तिची आई बोलली, की तुम्ही स्तोत्र म्हणत होता ते ती ऐकत होती.आता तुम्ही थांबलात न..मग परत म्हणा म्हणते आहे… ..मी हसले फक्त…तोच त्या बाईने मोबाईल काढला आणि बालगीत लावले हळू आवाजात…..
“शेजीबाईचा कोंबडा,
आला माझ्या दारी
घालिन कोंडा
पाजीन पाणी…….”
बाळ परत शांत होऊन गाणं बघत बसले. ….
माझ्या मनात आले, या बाळाला कुणी तरी एकसुरात काही म्हणले, तर त्याला चालण्यासारखे आहे…मग माझे स्तोत्र असो,की युट्यूब वरील गाणं !
पण माझं मात्र लक्ष त्या गाण्याकडे होतं… “शेजीबाईचं बाळ, आलं माझ्या घरी….”
मनात विचार आले….पूर्वीची शेजी बाई आता राहिली आहे का हो? इतक्या सहज पणे गाणं चाललं होतं…तितकी नाती आता या घडीला राहिली आहेत का? पूर्वी चाळ संस्कृती होती….त्यामुळे सर्व घरे आपल्या मालकीची असल्या प्रमाणे सर्व चाळीतील मुले कुणाकडे ही सापडतील किंवा, कुणाकडे ही जेवताना ,खाताना ,खेळताना सापडत असतं. जेवायला पकडून आणावी लागत एवढी रमलेली असतं ही मुले. घरच्या बायका पण आपल्या एवढंच शेजारचीच्या मुलांवर प्रेम करत, किंवा चुकले ते, तर हक्काने रागवत.चाळीतील सर्व स्त्रिया या एकमेकींना धरून असतं. घरी लोणचे,मेतकूट किंवा मसाला सारखे पदार्थ बनले तर वाटी वाटी आधी शेजारची कडे पोच व्हायचे……वाडा संस्कृती पण अशीच होती. तुझं माझं असं आत्ता सारखं नव्हतं त्यावेळी.आता फक्त स्वतःच्या घरा पुरतं केलं जातं किंवा विकतच आणलं जातं. आता सगळी कडे परिस्थिती बदलली आहे.
आता सिमेंट काँक्रीटच्या घरात आतल्या आत या स्त्रिया बंदिस्त होऊन घुसमटून गेल्यात. कुणाच्या घरी काय शिजतेय हे पलीकडे सुद्धा कळत नाही. शेजारची सुख दुःख आता पूर्वी प्रमाणे बायका वाटून घेत नाहीत. पूर्वी लग्न होऊन आले त्यावेळी आपल्या घरी केलेले धिरडे किंवा थालिपीठ, इडली शेजारच्या अमृता ,माधुरी नावाच्या मैत्रिणीकडे हमखास मी पोहचवत होते…त्या ही खूप उत्तम उत्तम पदार्थ देत असत…हरतालिका,वटपौर्णिमा असताना तर आम्ही एकीकडेच करायचो फराळ….

पूर्वी एकमेकींच्या कडे जाताना फोन नव्हते करावे लागत..किंवा येऊ का ?म्हणून आधी अपॉइंटमेंट नव्हती घ्यावी लागत. कुणी कधी ही कुणाच्या ही घरी हक्काने जात येत होतो…अगदी एखादी स्वयंपाक करत असेल तर बिनधास्त तिच्या स्वयंपाक घरात तिच्या शेजारी खुर्ची ओढून किंवा पाट घेऊन तिला मदत करत गप्पा मारत असू…..गप्पांच्या नादात खूप ज्ञान तरी मिळत असेच..पण हसत खेळत स्वयंपाक होऊन जात असे…..आग्रह झाला की एखादी पोळी भाजी पण खात असू…कसलाच धरबंध किंवा संकोच नव्हता शेजारी जाण्यात/येण्यात…. घरच्या पुरुषांना पण हे सर्व चालत असे…. माहितीचे होते. एप्रिल फूल दिवशी तर एकमेकींची खिल्ली उडवण्यात मी माहीर होते…दरवर्षी नवीन कृप्त्या काढून या शेजारणींना सतावत असे…त्या मैत्रिणी तर आधीच म्हणायच्या यावेळी पल्लवी आम्ही नाही फसणार बरं….पण फसायच्याच…
शेजारणी इतक्या चांगल्या असायच्या, की वेगळ्या मैत्रिणी किंवा मैत्रिणींचा गृप असं आजच्या सारखा प्रकार नव्हता. आज भिशी निमित्ताने मैत्रिणी महिन्यातून एकदा भेटतात…पण पूर्वी रोजच भेटायच्या… कामे आवरली की कुणाच्या तरी घरात शिरायचेच, हा न ठरवता जमलेला शिरस्ता असे. आज असे होत नाही…
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुखात सगळेच असतात , पण दुःखाच्या वेळी शेजारची मैत्रीण किंवा शेजारी जी काही काळजी घेऊन जबाबदारी उचलतात त्याची बरोबरी कशातच नव्हे. आज सुद्धा शेजारी पहिले धावून येतात, नातेवाईक मागून येतात… संकट काळी सर्वात जवळची व्यक्ती शेजारची असते.म्हणून जरी पूर्वी सारखा शेजार आता नसेल, तरी आहेत त्यांच्याशी मिळून मिसळून वागणे…शक्यतो येणे जाणे ठेवावे.

नुकतेच आपण न्युज मध्ये बघितले ,की रवींद्र महाजनी यांचा मृत्यू….शेजारी लोकांशी काहीही संपर्क नसल्याने त्यांच्या मृत्यू नंतर २/३दिवसांनी वास सुटल्यावर ते गेल्याचे कळले….अशी दु:खांतिका कुणाची ही न होवो. या साठी आपले नातेवाईक हे आपल्या जवळ आजकाल नसतात…तेंव्हा हे शेजारीच आपले असतात. त्यांच्याशी निदान येता जाता आपणहून बोलावे, विचारपूस करावी. माझ्या नातवाला जेंव्हा रात्री १२वाजता convulsion attack आला होता, त्यावेळी रात्री आहे त्या कपड्यानीशी आम्ही हॉस्पिटल गाठले होते , त्यावेळी शेजारच्या बायकांनीच येऊन स्वतः च्या घरचे कुलूप लावून सर्वजण रात्री ३ पर्यंत आमची वाट पहात बाहेर बसल्या होत्या. कारण आम्ही गडबडीत बंगल्याला कुलूप काय, दार ही लावायचे विसरलो होतो…..
पूर्वी लग्न समारंभ गावात असायचे , तर अख्खा गाव मदतीला उभा असायचा. मुलीचे लग्न म्हणजे आपलीच मुलगी चालली असे वातावरण असायचे…
आता हे चित्र खूप दुर्मिळ दिसते….आता फ्लॅट संस्कृती आलीय…अगदी लहान गावात ही पोहचली आहे…शेजारी कोण राहते हे माहीत नसते…आत शिरले की आपोआप दार लॉक होते. सतत बंद दरवाजा संस्कृती मुळे शेजारधर्म, मैत्री ही लोप पावत आहे…वाटीभर साखर किंवा लोणचे मागायच्या/द्यायच्या निमित्ताने घटकाभर गप्पा आता होत नाहीत..सहज जरी जावे म्हणले, तर का आलात असा भाव चेहऱ्यावर असतो..आपल्यालाच कानकोंड होऊन जायला होतं…म्हणजे काही काम असेल तरच शेजारची बेल वाजवली जाते.

काही वर्षांपूर्वी जागतिक स्तरावर एक संशोधन झाले होते. शेजारधर्म पाळणारी माणसे अधिक सुखी आणि सकारात्मक असतात. शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध असल्यास तुम्ही प्रसन्न आणि आरोग्यदायी आयुष्य जगू शकता, असा निष्कर्ष त्यात मांडण्यात आला होता. बंद दरवाजे ही आपल्या देशाची संस्कृती नाही; पण ‘शेअरिंग’ आणि ‘एकत्र कुटुंब पद्धती’ या दोन्ही गोष्टी आपल्या जगण्यातून हद्दपार होत असल्यानं ‘चांगले शेजारी’ असण्याची गरज पुन्हा निर्माण झाली आहे. या सर्वेक्षणानुसार, तुमचं घर सुरक्षित ठिकाणी असेल आणि त्यातही तुमचे शेजारी तुमच्या विश्वासातले, कुटुंबातल्या सदस्यांसारखे असतील, तर ताणतणाव, हृदयविकार, निराशा या गोष्टी टाळून सुंदर, आरोग्यदायी आयुष्य जगणं शक्य आहे.
परत शेवटी मी हेच म्हणेन, की शेजारधर्म जपताना घरच्या स्त्रीचे योगदान खूपच महत्वाचे असते. तीच एकमेव अशी सदस्य असते, जी दोन्ही घरातील सदस्यांचे एकमेकात असलेले अंतर कमी करून संबंध अधिक उत्तम राखू शकते.
तर अशा सर्व स्त्रियांना, ज्या शेजारधर्म उत्तम प्रकारे पाळून समाज निकोप करायला हातभार लावतात त्यांना ही आजची माळ अर्पण करते.

“या देवी सर्वभूतेषु क्षुधा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः”॥
…………………………………….…….
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
२१/१०/२३

Posted in लेख, स्वरचित...

नवरात्र…सहावी माळ.

(६)
सहावी माळ……..
नवरात्र दुसरे वर्ष….
मला भावलेलं स्त्रीत्व🙏
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏

नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।

सहावी देवी कात्यायनी नमस्कार असो🙏🙏
चन्द्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्यादेवि दानवघातिनी॥६॥

अर्थ…
चंद्रहास, शार्दुल, सिंहावर स्वार होऊन राक्षसांचा संहार करणारी तेजस्वी माता कात्यायनी आपल्या सर्वांसाठी शुभ होवो.

काल मी देवीची ओटी भरायला म्हणून येथील एका देवीच्या देवळात गेले होते….ओटी भरून तिथेच एका जागी बसून श्रीसुक्त म्हणत थोडावेळ बसले होते.
आजूबाजूला गर्दी होती, मुले खेळत होती,पळत होती. तर त्या मुलांमध्ये एक जुळ्या मुलींची जोडीने माझे लक्ष वेधून घेतले. सेम टू सेम…खूप गोड होत्या त्या…तिथेच बसलेल्या त्यांच्या आईशी मी बोलत होते…मी म्हणले,
‘ कसे ओळखता तुम्ही किंवा घरचे त्यांना काय माहीत बाई…’
ती हसली फक्त…नावे पण गोड होती त्यांची. केतकी आणि प्राजक्ता.
ती म्हणाली, ”नीट बघा! दोघींच्या रंगात किंचित फरक आहे…एक जरा सावळी आणि दुसरी गोरी… सावळी म्हणून ती केतकी…आणि गोरी म्हणून ही प्राजक्ता….अहो! घरी तर काळी गोरी म्हणून चिडवत हसत असतात सगळे.”..इती ती आई!

मला आत्ता पर्यंत कळलेच नव्हते, माझं लक्षच रंगाकडे नव्हते,तर त्यांच्या निरागस हसण्या खिदळण्याकडे होते……नीट बघितल्यावर लक्षात आले. मला धक्काच बसला. पण रंगावरून नावे ठेवली हे ऐकून आश्चर्य वाटले. केतकी म्हणून काळा म्हणे! ..हे कुठले लॉजिक ? काय परिणाम होईल केतकी वर….पुढे मोठी होईल तशी.. घरातूनच असे ऐकायला आले तिला, तर उद्या बाहेरचे पण म्हणू शकतील न ! बाळ मनावर एकदा ओरखडा उठला, तर तो कायमचा व्रण राहतो. खरचं आज ही घरातून काळी गोरी म्हणून म्हणत असतील? मला विश्वासच बसत नाही अजून ही. त्या बाईला समजावून पण सांगितले, की असे बोलणे बंद करा म्हणून.पण न ओळखीची न पाळखीची. ….क्षणभराच्या भेटीतून ती माझे का बरे ऐकेल?…आणि का ऐकावे न?

पण एक गोष्ट खरी आहे…आज ही आपण 21व्या शतकात एवढी क्रांती करून, एवढे पुढे गेलो असलो, तरी ही रंगावरून तुलना ही होतीच होती. आज लग्नाच्या बाजारात ..,(हो मी बाजारच म्हणेन…कारण समाजाचे वागणेच तसे आहे.)…..गोरे पणाला खूप महत्व आहे . आता पर्यंत मुली कितीही शिकल्या किंवा न शिकल्या तरी त्या गोऱ्या असणे ही पहिली अट असते…. .. पूर्वापार पासून आज पर्यंत हे कमी झालेले नाही .आता फरक इतकाच पडला आहे, की आजकाल मुलींना ही गोराच नवरा हवा असतो….. म्हणजे काय तर व्यक्तीच्या बाह्य सौंदर्याला , दिखाव्याला आता महत्त्व जास्त मिळत आहे.एखादे लव्ह मॅरेज करून आलेल्या जोडप्याला त्याच्या पेक्षा रंग रूपाने कमी असलेली मुलगी बघून घरातील लोकच यापेक्षा कुणी चांगली मिळाली असती रे! म्हणून हिणवणारे कमी नाहीत आपल्या आजूबाजूला.

एखादी सावळी स्त्री काय कमी कर्तबगार असते का ?…की तिच्यात काहीच सद्गुण नसतात? की ती पैसे कमवायला लायक नसते, की जगायला लायक नसते? हा कुठला न्याय आहे ? आपला देश हा गोऱ्या लोकांचा देश आहे का? सर्व मुली गोऱ्या आणि देखण्या कशा असतील?… तिच्यातील अंतर्गत सौंदर्य किती तरी पटीने अधिक असते . ती उत्तम स्त्री म्हणून समाजात ताठ मानाने उभी असते, कर्तुत्ववान असते. अनेक ठिकाणी ती लीलया संस्था चालवत असते, बॉस म्हणून मिरवत असते ..बिझनेस करत असते….पण लग्नाच्या वेळी मात्र तिचा रंग आडवा येतो?….ही कुठली मानसिकता? श्रीमंतांच्या घरी किंवा उच्चभ्रू घराण्यात रंगांनी एकदम सावळ्या असणाऱ्या स्त्रिया क्वचित आढळतील. तिथे मखरात सुंदर, देखण्याच महिला दिसतील…मग अकलेने कांदा असल्या तरी….
मला हे पटतच नाही .हे कितपत योग्य आहे..मी कॉलेज मध्ये होते तेंव्हा आमच्या कॉलेज मध्ये एक मामड्याल नावाची मैत्रीण होती . ती साळी समाजापैकी होती.वर्णाने पूर्ण काळी होती.पण ती इतकी सुंदर होती की येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नजरा तिच्याकडे जायच्याच.. एकतर तिचे व्यवस्थित रहाणे, वेशभूषा उत्तम साजेशी….. सर्वांशी हसतमुख, हसरी हसरी..अभ्यासात एक नंबर, मित्र मैत्रिणी अफाट. सोलापुरात सलग ३/४ वर्ष दंत स्पर्धेत प्रथम क्रमांक…
अशी व्यक्ती मग ती माणूस म्हणून उत्तमच स्त्री होती…तिचा कुठे ही रंगावरून कुणी बोलत नसे…तिच्यात काहीच कमीपण नव्हते…पण लग्नाच्या वेळी काय त्रास झाला ते माहित नाही . तर सांगायचा मुद्दा हा, की अशा असंख्य मुली ज्या स्वभावाने, कर्तुत्वाने किंवा अंतर्गत गुणधर्मात … अतंर्गत सौंदर्यात योग्य जागी असताना, त्यांचे समाजात व्यक्ती म्हणून एवढी अवहेलना का केली जाते…तिला कमी का लेखले जाते?
टिव्ही वर मध्यंतरी ‘ रंग माझा वेगळा ‘ ही मालिका येऊन गेली. म्हणजे सिरीयलवाल्यांना ही अशा काळया गोऱ्या बहिणींवर सिरीयल काढावी वाटली…. टिव्ही आणि सिनेमाचे विषय हा समाजाचाच आरसा असतो. म्हणजे हा समाजातील राजरोस वाढत असलेला प्रश्न आहे. त्यात ही काळया सावळ्या मुलीची भूमिका केलेली दीपा हे पात्र घरातील, बाहेरील सदस्यांच्या तिरस्कृत नजरेला आणि त्यांच्या वागण्याला कशी समर्थपणे तोंड देते, हेच दाखवले आहे आणि आपल्या स्वभावाने आणि हुशारीने ती या सर्वांना भारी पडत सर्वांची मने जिंकते…पण याचा त्रास हा होतोच अशा सावळ्या स्त्रीला.
आज जर नवरा बायको जोडीत कुणी एक गोरा आणि कुणी काळा असेल , तर बघणारेच म्हणतात, ” किती विजोड जोडी आहे ही ! याला/हिला यापेक्षा चांगली /चांगला मिळालं असतं स्थळ “
….अरे ! पण ती जोडी आपापसात खुष आहे, संसार उत्तम करत आहेत… मुलं बाळ आहेत…मग तुमच्या का पोटात दुखतयं…का वायफळ कमेंट करत आहात तुम्हीं..!

हे कुठे तरी थांबायला हवे. घरातूनच लहान पणापासून मुलांवर तसे संस्कार व्हायला हवेत . वर्ण भेद करणे कसे चुकीचे आहे हे सांगायला हवे मुलांना..कुणाला मागून रंग मिळत नसतो,तर तो जन्मत:च येत असतो……घरातील सदस्यच जर वर्णा वरून तिला सतत टोमणे मारतील, तर बाहेर हे घडणारच. आणि वरून कसे ही रूप असेल,तरी ती स्त्री म्हणून,एक माणूस म्हणून किती छान आहे, सुंदर आहे हे ओळखायला हवे. हो न!
आज टिव्ही वर प्रत्येक सिरीयल किंवा जाहिरातीत सहाय्य किंवा प्रमुख भूमिकेत गोरीच नटी असते. आपली बघणाऱ्याची पण तीच मागणी असते…मागणी तसा पुरवठा …म्हणजे या गोष्टीला आपणच जबाबदार नाही का बरं?
मध्यंतरी टिव्हीवर सतत Fair & Lovely ची जाहिरात येत होती..म्हणजे हे आमचे क्रीम लावा आणि पटकन गोरं व्हा…असा फंडा होता जाहिरातीचा.पण ही जाहिरात करायला कंगना राणावत, साई पल्लवी या सारख्या नट्यानीं नकार दिला.कंगना तर म्हणाली, माझी बहिण काळी आहे. जर मी ही जाहिरात केली, तर तिच्या रंगावर चेष्टा केल्यासारखे होईल.आणि साई पल्लवी तर आहे तशी स्किन कॅरी करते. समाजातील महिलांनी ही या जाहिराती विरुध्द आवाज उठवला.व आमचा रंग आम्हांस प्रिय आहे असं ठणकावून सांगितले…आणि या जाहिरादारास आपले नाव बदलून Glow & Lovely असं ठेवावे लागले. ही आहे स्त्री शक्ती…. असं कोणत ही क्रीम लावून गोरं होत नसतं कुणी….हे कळायला हवे समस्त स्त्री जातीला…वेगवेगळे क्रीम चोपडून आपल्या गालाचे मात्र भजं व्हायला वेळ लागत नाही .आणि अशा मुळे कायमचे व्रण मात्र ठिय्या मारुन बसतात गालावर तो वेगळाच विषय…..स्त्री ने एकदा मनात आणलं, तर ती काहीही बदलवू शकते ,प्रसंगी कोणतीही परिस्थिती देखील.

हे ही दिवस जातील आणि समाज बदलेल…नव्हे बदलावा लागेल, नाहीतर स्त्रियाच बदलतील. तिच्यात तेवढी ताकद निश्चितच आहे..आज चंद्रावर जाणाऱ्या आमच्या भगिनी असल्या फालतू गोष्टीत अडकून फसणाऱ्या नाहीत,आणि सहन ही करणार नाहीत या पुढे…तो जमाना आता कालानुरूप मागे पडला…जो “सहनशीलता म्हणजे स्त्री”…. हे समीकरण जाणत होता. आता स्त्री समाज घडवते आणि सांभाळते ही उत्तम….ते ही स्वकृत्वाच्या बळावर ..तिथे ती काळी की गोरी हा भेद पूर्ण विसरून कामाप्रती निष्ठा ठेवून आपली ‘स्व:’ ची ओळख निर्माण करत आहे. आणि आपल्या कामात पूर्ण कर्तव्याची जाण ठेवली की आत्मविश्वास प्राप्त होतो.आणि आत्मविश्वासानं जगणारी स्त्री आपोआप सुंदर होते. सौ.सुध्दा मूर्तींच्या मते देखील…..
प्रत्येक स्त्रीने हे लक्षात घ्यायला हवे,की पुरूषी नजरेतून स्वतःचं सौंदर्य तोलणं, म्हणजे स्वतः मधील स्त्रीत्वाचं अधःपतन करवून घेणं आहे…सौंदर्य बाहेर कशात नाही, तर मनांत आहे… आपण करत असलेलं प्रत्येक काम म्हणजे सौंदर्याचंच सादरीकरण असतं… आपल्याला आपल्या कृतीतून सौंदर्याची निर्मिती करता आली पाहीजे…
अभिमान आहे मला तिचा आणि तिच्यातील स्त्रीत्वाचा. आज ती नवदुर्गाच्या रुपात समाजात वावरत आहे . मुलगी, बहीण, बायको,आई….भूमिका निभावताना ती कधी घरात अन्न बनवणारी अन्नपूर्णा , तर प्रसंगी अन्यायाचा सामना करणारी रणचंडिका किंवा महिषासुर मर्दिनी असते …
अशा या आमच्या सर्व भगिनिंच्यातील स्त्रित्वाला माझा मानाचा मुजरा..

”या देवी सर्वभूतेषू कान्ति रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः”
…………………………………………….
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
२०/१०/२३

Posted in लेख, स्वरचित...

नवरात्र…पाचवी माळ…

(५)
पाचवी माळ……
मला भावलेलं स्त्रीत्व🙏
नवदुर्गाच्या नऊ स्तोत्रांसहित…🙏
नवदुर्गा मंत्र
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी
तृतीयं चन्द्रघंटेति कूष्माण्डेति चतुर्थकम्,
पंचमं स्क्न्दमातेति षष्ठं कात्यायनीति च
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्,
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः।।

पंचम देवी स्कन्दमाता नमस्तुभ्यम..🙏🙏

सिंहासनगता नित्यम् पद्माश्रितकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी॥५॥
अर्थ…….सिंहावर स्वार होऊन दोन हातात कमळाचे फूल धारण करणारी प्रसिद्ध स्कंदमाता आपल्यासाठी शुभ होवो.
स्कंद म्हणजे कार्तिकेय… त्याची आई म्हणून ही स्कंदमाता .
मला वाटते आपण सर्वजण टिव्ही मालिका बघत असणारच. सध्या स्टार प्रवाह वर गेल्या २/३ वर्षा पासून ” आई कुठे काय करते ” ही मालिका चालू आहे.या मालिका बद्दल खूप मतप्रवाह आहेत…कुणाला आवडते कुणाला नाही.पण मी बघते आणि मला आवडते.

एक सर्व साधारण घरातील मुलगी, वडील नसल्याने लवकर लग्न होऊन नवीन घरी येते. शिक्षण लग्नामुळे अपुरे राहते, जे पुढे संसारात अधिकाधिक अडकत गेल्याने पूर्ण होऊ शकलेले नसते.अशी तुमच्या आमच्या सारखी एक संसारी स्त्री यात दाखवली आहे…घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत तीन मुलांची व सासू सासऱ्यांची सेवा करत असता, आपल्या आवडी निवडी ती पूर्ण विसरूनच गेलेली असते.

हेच चित्र तर आपण आज आपल्या आजूबाजूला बहुतेक प्रत्येक घरात बघत आहोत.किती तरी स्त्रिया आज लग्नानंतर आपले गाव आणि आपले मित्र परिवार बरोबर आपल्या आवडी, आपले छंद, सगळे सगळे मागे ठेवून आलेल्या असतात.
नवीन घर आपलेसे करता त्या स्वत:चे अस्तित्व विसरतात,आणि याची जाणीव क्वचितच एखाद्याला असते. आपले गाव सोडून येणाऱ्या स्त्रिया स्वतःचे अस्तित्व विसरतात…
‘ कोण होतीस तू, काय झालीस तू ‘… असं काहींच्या वाट्याला येतं…गोल्ड मिडेल मिळवलेल्या आणि आपल्या पायावर उभ्या राहिलेल्या मुली लग्नानंतर पूर्ण घरातच अडकतात…हा स्वानुभव ! ….

अशा कितीतरी स्त्रिया आहेत. तर काहींचा कायापालट ही उत्तम होतो…. लग्ना नंतर गाव चांगले मिळाले, घरदार प्रोत्साहन देणारे भेटले ,तर ती स्त्री आपल्या आयुष्यात यशाची शिखरे पादाक्रांत करताना दिसते…म्हणजे नाण्याला दोन्ही बाजू आहेत…पण त्या खऱ्या ही आहेत ..फक्त आपला जसा चष्मा तशी ती बाजू दिसते.

प्रत्येक स्त्री ने घराबाहेर पडले पाहिजे.. सतत घरामध्ये स्वतःला कामात बुडवून न घेता ,स्वतःचा विचार करायला हवा…त्यासाठी घराबाहेर पडले पाहिजे. अगदी नोकरी व्यवसाय जरी करत नसली ती, तरी काही काळ बाहेर भाजी आणायला, देवाला, मैत्रिणीकडे असे जायला हवे . बाहेरच्या व्यक्तींशी मिसळले पाहिजे ..म्हणजे आत्मविश्वास वाढतो. लोक ओळखतात, बोलतात…त्यामुळे आत्मिक समाधान मिळते. बाहेरचे जग कळते.

ती हे सर्व करत असताना मात्र हे लक्षात घ्यायला हवे की, पुरुषांच्या मानाने ती एक पाऊल पुढे आहे…कष्ट आणि जबाबदारीच्या दृष्टीने.
स्त्री ही निसर्गतः प्रजननासाठी निर्मिलेली गेली आहे..शिवाय घर ,कुटुंब यात भावनिक दृष्टीने जास्त अडकणारी आहे..घरावर आलेले कोणतेही संकट ती समर्थपणे पेलत पुढे जात राहते. हार मानून कच खात नाही कोणतीही स्त्री. घरची जबाबदारी पर्यायाने कुटुंबातील सर्व सदस्य, मुलांचे संगोपन ही उत्तम रीतीने सांभाळत, तारेवरची कसरत करत या बाहेरच्या जबाबदार्या पार पाडत आहे.
हे सर्व करत असताना कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य व्यवस्थित असणे अर्थातच आवश्यक आहे.

काळ पुढे सरकतो….आजची गोष्ट आता खरचं खूप बदलली आहे, पण आमच्या वेळी बायका बँकेची कामे, बाहेरचा बाजारहाट स्वतः करत नसत…नवरा या बाजू सांभाळत असल्याने…… आम्हां स्त्रियांना बँकेची कामे आता करायला थोड अवघड जाते….एकटीने बाजारहाट करणे अवघड वाटते …नवीन एखादी गोष्ट एकटीने खरेदी करणे म्हणजे पाप वाटते ..मग सोने चांदीच्या वस्तू एकटीने खरेदी करणे लांबच…
पण आता दिवस खूप बदलले आहेत… आज आपल्या लेकी सुना खूप स्मार्ट आहेत…एकटीने धडाधड निर्णय घेत सर्व आघाड्या अगदी समर्थपणे सांभाळत आहेत … आणि हे त्या घरातील वृद्ध लोकांना बरोबर घेऊन हे विशेष…म्हणजे फोन वरील ॲप समजावून सांगणे, लॅपटॉप हाताळायला शिकवणे, गुगल पे वर वस्तू कशा खरेदी करणे, घर बसल्या पैसे पाठवणे….हे सर्व सर्व तर ही नवीन पिढीच शिकवत असते आपल्या आई बाबा/सासू सासऱ्यांना…आणि मी म्हणते मुलांपेक्षा या मुलीच सावकाश छान शिकवतात आपल्याला.आणि आपण शिकतोय हे ही आपलेच कौतुक .
आमच्या वेळी असं नव्हतं, तसं नव्हतं म्हणतं त्यांना सतत उपदेश देण्या ऐवजी, जर आपण त्यांच्या नाविन्यतेचे कौतुक केले,त्यांच्या आवडी जोपासल्या ,तर मागची पिढी पण जीवनाचा नवीन अनुभव घेऊ शकते…मी हे फक्त सध्या स्त्री बद्दलच बोलते आहे, कारण स्त्रियाच फार काड्या करतात दुसऱ्या स्त्रीच्या संसारात असे म्हणतात..पण हे चित्र ही आता कमी होताना दिसत आहे…ही चांगली जमेची बाजू आहे.
माझे स्पष्ट असे मत आहे ,की प्रत्येक स्त्रीने स्वतः ला आपल्या आवडत्या कामात गुंतवून घ्यावे .स्वयंपाक पाणी,आले गेले हे सर्व सोडून, कारण ते तर करायचेच आहे आपल्याला. पण त्या व्यतिरिक्त….मग ती कोणत्याही वयाची का स्त्री असेना ..गाणी म्हणणे, क्लास घेणे, विणकाम,भरतकाम, फ्रिलांनसिंग ….लेखन,कविता ,कथा लिहिणे …चित्र काढणे….समाज उपयोगी काम करणे…ई. असे काही तरी निवडून त्यात रमवावे….म्हणजे बाकीचे नकारात्मक विचार मनात न येता सकारात्मक जीवन जगता येईल. आणि आपले वागणे हे नेहमी सकारात्मक आणि दुसऱ्याला मदत करण्यासारखे असावे. आपल्या सत्य आणि गोड वागण्याने समोरच्याला आपली गरज वाटली पाहिजे असे वागणे असावे आपले. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हे प्रत्येक घरच्या कर्त्या स्त्रीने आत्मसात करायला हवे. तिच्यावरचं घराचा संपूर्ण डोलारा उभा असतो. येवढ्या तेवढ्या गोष्टीने ˈपॅनिक् न होता धीराने आल्या प्रसंगाला शांत राहून मार्ग काढायला हवा.

घरी दारी लोकांनी आपल्याला मिस करायला हवे….तर ते योग्य जगणे होय… असे अर्थात माझे मत . कर्तुत्ववान स्त्री बद्दल मला काय सर्वांनाच आदर असतो …पण ज्या तशा नसतील , तर त्या आपल्या गोड वागण्याने आणि हसत मुख असतील तर नक्कीच त्या तोडीच्याच असतात. अशा स्त्रिया श्रध्दाळू असतात. देवावर श्रद्धा असणाऱ्या असतात. कुटुंबावर प्रेम करणाऱ्या असतात…

आता या नव्या पिढीत अजून एक बदल होताना दिसत आहे. तो म्हणजे लव्ह मॅरेज. हे स्विकारायला आता जुनी पिढी तयार ही झालीय.पण जाती बाह्य लग्न ही तितक्याच संख्येने आज होताना दिसत आहेत..आणि आपण ते सकारात्मक राहून स्वीकारत आहोत….ही खूप आनंदाची गोष्ट समाजात पसरत आहे. फक्त येणारी नवीन मुलगी ही वेगळ्या वातावरणातील असल्याने तिला सामावणे थोडे जड जाऊ शकते…तिला थोडा वेळ द्यायला हवा…आणि हे मुख्य काम घरच्या प्रमुख स्त्रीचे आहे…आणि ते तिने व्यवस्थित हाताळायला हवे. घरातच स्त्री स्त्रीची शत्रू असू नये…ह्याची दक्षता घ्यायला हवी…सासू – सून, नणंद – भावजय , जावा – जावा….अशा नात्यात प्रेम असावे, सौहार्दपूर्ण नातं असावे….तर अख्ख कुटुंब निरोगी, निकोप राहण्यास मदत होते. असो..!
हे सर्व घरच्या खंबीर स्त्री वरच अवलंबून असते.
अशा सर्व स्त्रियांबद्दल मला अतिशय आदर आहे . अशी समर्थ स्त्री आज प्रत्येक घरात आहे.आणि यापुढे ही असणार आहे. त्यांच्यातील या समर्थ स्त्रीत्वाला माझा मनापासून सलाम आहे…

“या देवी सर्वभूतेषु श्रध्दा-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”
……………………………………………..
©पल्लवी उमेश
जयसिंगपूर
१९/१०/२३