Posted in स्वरचित...

श्रीविष्णु सहस्रनाम स्तोत्र पठण | Shree Vishnu Sahasranama Stotram

श्रीविष्णु सहस्रनाम स्तोत्र.
हे स्तोत्र पठण करण्यामागे खूप मोठं पुण्य लाभते. हे विष्णू महात्म्य स्तोत्र आहे. ह्यात श्रीविष्णू यांच्या 1000 नावांचा उल्लेख आहे, म्हणून हे ‘विष्णू सहस्त्रनाम’ नावाने ओळखले जाते.
अधिक महिन्यास पुरुषोत्तम मास असे ही म्हणतात.पुरुषोत्तम हे श्री विष्णूचे नाव असल्याने या अधिक मासात या स्तोत्राचे महत्त्व कैक पटीने वाढते..म्हणून न चुकता अधिक मासात हे श्रीविष्णु सहस्रनाम स्तोत्र दिवसातून एकदा तरी वाचावे..किंवा ऐकावे तरी..
श्री विष्णुची पत्नी श्री लक्ष्मी…हीचे ही महत्त्व अर्थातच या काळात वाढते…म्हणून या श्री विष्णू स्तोत्रा बरोबरच श्री लक्ष्मी मातेचे
” श्री सुक्त ‘ हे स्तोत्र ही म्हणण्याचा प्रघात आहे..
ही दोन्ही स्तोत्रे कशी म्हणायची याचे शास्त्रोक्त पठण कसे करायचे हे मी माझ्या या चॅनल मध्ये म्हणून दाखवले आहे.आपणास या दोन्ही स्तोत्र पठणासाठी याचा निश्चितच फायदा होईल.
तर हे कसे म्हणायचे ते नक्की बघा ..आवडले तर नक्की सबस्क्राईब करा…म्हणजे या चॅनलवर पुढील नवीन नवीन स्तोत्रे अपलोड केली तर आपल्याला समजत राहतील.
जय श्रीकृष्ण 🙏
धन्यवाद🙏
………………………………………….
पल्लवी उमेश
जयसिंगपूर

Posted in स्वरचित...

गीतेश्वरी: श्रीमद्भगवद्गीता अध्याय पहिला | सारांश आणि पठण | Shrimad Bhag…

पहिला अध्याय याचा सारांश आणि हा अध्याय कसा म्हणायचा…हे या आजच्या भागात आहे…आपण नक्की हा भाग बघा🙏आपल्याला वरील सर्व भाग आवडले असतील तर कमेंट मध्ये नक्की अभिप्राय द्यावा ही नम्र विनंती🙏🙏

Posted in मी पाहिलेले नाटक अथवा चित्रपट

“बाईपण भारी देवा”….

“बाई पण भारी”

नुकताच ‘बाईपण भारी’ हा सिनेमा बघितला.खूप छान सिनेमा आहे.यात स्टारकास्ट जबरदस्त असल्याने आणि त्या सर्वांनी कामे उत्कृष्ठ केल्याने सिनेमा अर्थातच यशस्वी झाला आहे. केदार शिंदे यांचे कौतुक येवढ्यासाठी की एवढ्या बायका, त्यात ही त्या एकापेक्षा एक यशवंत…त्यांना एकत्र घेऊन सिनेमा काढणे,त्यांची मर्जी सांभाळून काम करवून घेणे सोपे नसणार…
या सिनेमातून जाता जाता अनेक संदेश मिळत जातात..हे ही यशाचे एक कारण आहे.उदा…मुलीच्या संसारात किती हस्तक्षेप करावा….ज्यामुळे मुलगी ही त्रासते…एका मर्यादे पुढे फार डोकावु नये कुणाच्या आयुष्यात…तर सुनेची आवड बघून तिला प्रोत्साहन देणे,तिला मुलगी मानणे… स्वतः ची ताकद ओळखुन वेळ प्रसंगी एकटे राहून स्वतः च्या पायावर आपण उभे राहू शकतो हा आत्मविश्वास , आपापसातील नात्यातील शुल्लक कारणामुळे येणारा दुरावा हा किती वर्षे टिकू शकतो….त्यामुळे हे टाळायला हवे..शुल्लक गोष्टींनी नात्यात दुरावा येऊ देऊ नये ..….
अशा अनेक गोष्टी या सिनेमातून मिळतात आणि विशेष म्हणजे यात कुठेही पुरुषांची बरोबरी करणे किंवा त्यांना कमी लेखणे हा उद्देश नाही…
यात पुरुष कलाकार पण तगडे घेतले आहेत ..काम कमी असले, तरी त्यांनी ही उत्कृष्ठ निभावले आहे .शरद पोंक्षे यांनी छोटी भूमिका उत्तम निभावली आहे…

प्रत्येक पुरुषांनी ही बघायला हरकत नाही हा सिनेमा.

या सिनेमा बद्दल उलट सुलट खूप प्रतिक्रिया ही वाचल्या . त्यातील चुका काढून ‘हा सिनेमा कसा काय कुणाला आवडू शकतो’….असा ही एक मत प्रवाह वाचण्यात आला….
त्यांना मला एकच सांगायचे आहे ..ते म्हणजे……..

सिनेमा चांगला आहे..त्याचा एवढा किस काढू नका. मनोरंजन म्हणून बघा..आणि हो सर्व महिला वर्ग त्यानिमित्ताने एकत्र येऊन सिनेमा बघत आहेत,फोटो,सेल्फी काढून घटकाभर सिनेमा हॉल मध्ये नाचत दंगा करत आहे..हे खरचं खूप छान आहे…महिला आनंद घेत आहेत…
त्यात स्टोरी चांगली नाही, हे पटले नाही… ते पटले नाही ..म्हणून कशाला वाद घालायचा?……
या सिनेमाला चक्क सिनियर सिटिझन पण येत आहेत थेटर मध्ये…माझ्या वेळेस तर 80 च्या आसपासच्या 3/4जणी होत्या…काठ्या टेकत आल्या होत्या…आम्ही ही सिनियर सिटिझन आहोत ..आमचा ही गृप घेऊन गेलो…जुने दिवस आठवले..टाळ्या वाजवून आम्ही ही दाद देऊन निर्मळ आनंद घेऊन घरी आलो..त्या निमित्ताने एकत्र आलो , खाणे.. पिणे केले,…मजा आली .. गप्पा ही झाल्या…फ्रेश होऊन परतलो…..
हा आनंद नक्कीच या सिनेमाने घरोघरी दिला आहे..
आम्ही चुका काढत नाही बसलो….
तरी आनंद घ्या..आनंद द्या…एवढंच🙏

जरूर आपल्या मैत्रिणींना घेऊन थिएटर मध्ये सिनेमा बघून या .सोबत दंगा मस्ती करून एन्जॉय करा… एखादा दिवस आपला म्हणून साजरा करा….
……………………………………..
पल्लवी उमेश ..

जयसिंगपूर

Posted in लेख

गुरुपौर्णिमा 🙏

गुरुपौर्णिमा🙏🙏

“गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ “

गुरु म्हणजेच ब्रह्मा, गुरु म्हणजेच विष्णू,आणि गुरु म्हणजेच महादेव आहेत.गुरु हेच साक्षात परब्रह्मच आहेत.अशा श्रीगुरुंना माझा नमस्कार असो!

             आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून स्वीकारला आहे. या दिवसाला “व्यास पौर्णिमा” देखील म्हणतात. कारण हा दिवस महाभारताचे मुख्य रचयिता श्री महर्षी व्यास यांचा जन्म दिवस आहे. श्री महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. म्हणून यांना ‘वेद व्यास ऋषी’ ही म्हणले जाते. या सर्व वेदां मधून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. यांना आद्यगुरु मानले जाते. म्हणून त्यांच्या या अद्वितीय कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्व ऋषींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ अथवा ‘’गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात.

            आपल्या जीवनात गुरुंचे स्थान सर्वश्रेष्ठ मानले आहे. आपल्याला उत्तम आणि निस्वार्थी ज्ञान आणि मार्गदर्शन करणारा हा आपला गुरु असतो. जन्मतः आपल्याला पहिला गुरु प्राप्त होतो तो मातेच्या रुपात….

“आई माझा गुरु

आई कल्पतरू…” 

अशी आईची महती आपण गात असतो..त्यांनतर आई बरोबर आपले पालनपोषण,जबाबदारी घेणारे आपले दुसरे गुरु म्हणजे आपले वडील.

“पितृ देवो भव!” 

म्हणून आपण त्यांची पूजा करतो..8 व्या वर्षी गुरुगृही जाताना मुंज हा वैदिक विधी केला जातो, त्यावेळी वडीलच मुलाला कानात गुरु मंत्र सांगून गुरुगृही (आश्रम) पाठवतात. पुढे गुरू हाच मुलाचा पथदर्शक असतो.आज आपण गुरुगृही न जाता शाळेत जातो . पुढचे शिक्षण घेण्यासाठी. त्यावेळी शिक्षक हे आपले तिसरे गुरू भेटतात,जे ज्ञानार्जन करून आपल्याला जीवन विषयक आवश्यक गोष्टी शिकवतात..

अशा प्रकारे जन्मापासून आपल्याला गुरु हे भेटत असतात..शाळेत गेल्यानंतर तिथून पुढे पावलोपावली विविध क्षेत्रातील गुरूंची भेट होत जाते. मग मित्राच्या रुपात नाहीतर कलेच्या क्षेत्रात ही गुरू भेटतात.अशा या गुरूंना आपण पूर्वी ऋषीमुनी देत होते तशी गुरुदक्षिणा नाही देऊ शकत ,तर त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करतो, तो हा दिवस.

गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्या पर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

गुरूंच्या प्रती आपली भावना शुद्ध हवी.समर्पणाची हवी.गुरूंवर पूर्ण श्रद्धा हवी,तर पुढची ज्ञानाची कवाडे आपोआप उघडत जातात.आपल्याला समृद्ध करून सोडतात.

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.नम्रतेने जे मिळू शकते,ते ताठपणाने माणूस क्षणात गमावू शकतो.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आद्ययावत पूजा करण्याची प्रथा आहे.यादिवशी प्रथम 

 ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ 

ही श्री व्यास महर्षींची  प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.

“सद्गुरूवांचूनी संसारी तारक।

नसेचि निष्ट्नक आन कोण्ही।

इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करुनी।

संशयाची श्रेणी छेदिता ना।।”…..

या श्लोकात संत ज्ञानेश्वरांनी आपले गुरू श्रीनिवृत्तीनाथ यांच्या विषयी कृतद्न्यता व्यक्त करताना म्हणतात,की एका सद्गुरुशिवाय संसारसागरातून बाहेर काढणारा दुसरा कोणीही नाही. त्याच्या बळावरच भवसागर ओलांडता येतो असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.पुढे म्हणतात इंद्र,चंद्र,काय पण ब्राह्मदेवही जीवाच्या मनातील संशय दूर करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात…..

“उघडे परब्रह्म सद्गुरुची मूर्ति।

पुरविती आर्ती शिष्याचिया।

वंचना करिती जन दुष्ट नष्ट।

मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती।

ज्ञानदेव म्हणे गुरूचा मी दास।

नेणें साधनास आन काही।।”….

 प्रत्यक्ष परब्रह्माची मूर्ती असलेल्या सद्गुरुंमुळे मात्रसाधक शिष्य आपली इच्छा पूर्ण करू शकतात.इथे ज्ञानदेवांनी सद्गुरू आणि प्रत्यक्ष परमात्मा यांचे अद्वैत कल्पून सद्शिष्याला त्याच्या इच्छेप्रमाणे फळ देतात असे म्हटले आहे.पुढे म्हणतात,दुर्देव असे की अशा परब्रह्माची निंदा करणारे ही लोक आहेत.पण काही मुख्य श्रेष्ठ अधिकारी लोक असतात,ते मात्र त्यांना नम्रपणाने सतत वंदनच करीत असतात.

श्री ज्ञानेश्वर महाराजांना श्री निवृत्तीनाथ सद्गुरूंचे महानत्व मान्य असल्यामुळे ते सद्गुरुंच्या दास्यत्वात सतत मग्न असत. सद्गुरू भक्ती हे परमार्थाचे जन्मस्थान मानत. 

        सद्गुरू हे आपल्याला ज्ञानाच्या अंधकारातून ,ज्ञान प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जात असतात..

आज आपण बघतो आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आज गुरू- शिष्यांच्या असंख्य जोड्या असलेल्या आपल्याला दिसतात.मी म्हणते की, भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सदगुरुंशी भेट होते व सदगुरुंकडे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची महती कळते.

सदगुरुंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सदगुरु उचलतात. त्यांच्या मागे-पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सद्गुरु  नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला घेऊन जातात.

म्हणून शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते,

“गुरु बिन ज्ञान , कहा से लावू”…..हेच खरे आहे.

“श्रीसद्गुरू नमो नमः ।”

———————————————

© पल्लवी उमेश

जयसिंगपूर, जिल्हा. कोल्हापूर.